बेळगाव लाईव्ह :बेळगावमधील प्रमुख सहकारी संस्था आणि बँकांच्या आगामी निवडणुका एका हाय-व्होल्टेज सत्ता संघर्षात रूपांतरित झाल्या असून बेळगावमधील बहुतेक वरिष्ठ राजकारणी त्यात गांभीर्याने सहभागी होत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील राजकारण बऱ्याच काळापासून सहकारी संस्थांभोवती फिरत आहे. आता येणाऱ्या सहकारी निवडणुकांमुळे येथील दिग्गज राजकीय नेत्यांमध्ये तीव्र लढतीला सुरुवात झाली आहे.
हुक्केरी तालुक्यातील संगम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी निवडणूक 27 सप्टेंबर रोजी होणार आहे, त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या नियंत्रणासाठी 19 ऑक्टोबर रोजी होणारी स्पर्धा राज्याचे लक्ष वेधून घेणारी आहे.
तथापी विशेषतः हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्था (एचआरईसीएस) वर साऱ्यांचे लक्ष केंद्रित असणार आहे. ही सहकारी धर्तीवर वीज पुरवठा करणारी देशातील एकमेव संस्था आहे. येथील लढत गोकाकच्या जारकीहोळी बंधू आणि हुक्केरीच्या कत्ती कुटुंबातील थेट लढतीत रूपांतरित झाली आहे.
गेल्या काही दशकांपासून हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना (संकेश्वर), हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्था आणि बेळगाव डीसीसी बँक या तीन शक्तिशाली सहकारी संस्था कत्ती कुटुंबाच्या ताब्यात होत्या. आता जारकीहोळी घराणे त्या वर्चस्वाला आव्हान देत आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते ते एचआरईसीएस आणि डीसीसी बँकेपासून सुरुवात करून या प्रमुख संस्थांवर नियंत्रण मिळवण्यास उत्सुक आहेत.




राजकीय संघर्ष आधीच तीव्र शाब्दिक हल्ल्यांमध्ये बदलला असून माजी खासदार रमेश कत्ती यांनी उघडपणे जारकीहोळींना लक्ष्य केले आहे, तर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी त्याला आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. तथापि, स्थानिक लोक हे राजकीय द्वंद्व कोणत्या दिशेने वळेल यावर लक्ष ठेवून आहेत. रमेश कत्ती यांनी जाहीर केले आहे की त्यांचा गट केवळ विद्युत सहकारी संस्थेची नाही तर आगामी सर्व निवडणुका लढवण्याची तयारी करत आहे आणि तळागाळातून योजना आखल्या जात आहेत. पक्षाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळवून त्यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. “आम्ही निःसंशयपणे सत्तेत परत येऊ.” असे ते आत्मविश्वासाने सांगत आहेत.
हुक्केरी येथील प्रचार क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वतः प्रवेश केला आहे. सक्रियपणे बैठका घेत आणि सभांना संबोधित करत त्यांनी हिरण्यकेशी कारखाना आणि एचआरईसीएस या दोन्ही संस्थांना पुनरुज्जीवित आणि बळकट करण्याचे वचन दिले आहे. अप्पन्नागौडा पाटील यांच्या वारशाचा फायदा घेत ते त्यांच्या गटाच्या इलेक्ट्रोल रणनीतीचे पूर्ण ताकदीने नेतृत्व करत आहेत.
जवळजवळ 3 दशकांपासून हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्थेत कधीही निवडणुका झाल्या नव्हत्या. कारण कत्ती कुटुंबांचे वर्चस्व होते, संचालक प्रत्येक कालावधीमध्ये अविरोध निवडून येत होते. तथापी माजी मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनानंतर ती अखंड मालिका खंडित झाली आहे. आता 30 वर्षांतील ही पहिलीच निवडणूक आहे की हुक्केरीमध्ये कत्ती कुटुंबाचा प्रभाव राहिलेला नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे .


