बेळगाव लाईव्ह : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बेळगावातर्फे भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा रविवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी उद्यानातून सुरू होऊन धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत जाणार आहे. बेळगाव सकल मराठा समाजाचे समन्वयक गुणवंत पाटील आणि सह-आयोजक प्रकाश मरगाळे यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
बेळगाव येथील मराठा समाजाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, जरांगे पाटील यांचे आंदोलन मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडत आहे. या उपोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
बेळगावातील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी आरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या आंदोलनामुळे समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळण्यासाठी व्यापक दृष्टीकोन निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




या पत्राद्वारे, बेळगाव सकल मराठा समाजाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक विचार करून लवकरच ठोस निर्णय घेण्याची विनंती केली आहे. या मागणीसाठी आम्ही संघटितपणे जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.


