बेळगाव लाईव्ह : जय किसान होलसेल भाजी मार्केटचा भू-वापर परवाना रद्द करण्याचा अन्यायकारक आदेश मागे घेण्यात यावा. तसेच इस्माईल मुजावर या व्यापाऱ्याच्या मृत्यू कारणीभूत असलेल्या बुडा आयुक्तांसह अन्य आठ जणांवर कारवाई केली जावी, अशी मागणी जय किसान होलसेल भाजीपाला व्यापारी संघटनेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि सरकारकडे केली आहे.
जय किसान होलसेल भाजी मार्केट मधील व्यापारी काल शुक्रवारी दुपारी महापौर व मनपा आयुक्तांची भेट घेण्यासाठी महापालिकेमध्ये गेले होते. त्या ठिकाणी आपली कैफियत मांडून बाहेर पडताना इस्माईल मुजावर (वय 45, रा. वडगाव) या व्यापाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जय किसान भाजी मार्केटचा भू-वापर परवाना रद्द या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे संतप्त झालेल्या सदर भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
त्या ठिकाणी जय किसान होलसेल भाजीपाला व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव शहराबाहेरील जय किसान होलसेल भाजी मार्केट हे आवश्यक सर्व खात्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तसेच सरकारच्या अटी नियमांचे पालन करून चालवले जात आहे. या पद्धतीने कायदेशीररित्या भाजी मार्केट चालवले जात असताना देखील कांही मंडळी व स्वयंघोषित शेतकरी नेते आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जय किसान भाजी मार्केट बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली या भाजी मार्केटचा भू-वापर परवाना रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या पद्धतीने न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे वारंवार उल्लंघन करून त्रास दिला जात आहे. नुकत्याच काढण्यात आलेल्या भू वापर परवाना रद्द आदेश या संदर्भात आम्ही काल शुक्रवारी महापौर आणि मनपा आयुक्तांची भेट घेतली. तसेच त्यांना जय किसान भाजी मार्केटवर अन्याय करू नये अशी विनंती केली आहे. महापौर व आयुक्त यांची भेट घेऊन परतत असताना आमच्यापैकी इस्माईल मुजावर या मानसिक ताण वाढलेल्या व्यापाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सदर व्यापाऱ्याच्या मृत्यूस बुडा आयुक्तांसह सिदगौडा मोदगी, राजू टोपण्णावर, सुजित मुळगुंद, व्यापारी सतीश पाटील, सदा पाटील, आदी सर्वजण कारणीभूत आहेत. तेंव्हा त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जय किसान होलसेल भाजी मार्केटमधील एक व्यापारी मोहन मन्नोळकर यांनी सांगितले की, जय किसान भाजी मार्केटचा भू-वापर परवाना रद्द करू नये अशी विनंती करण्यासाठी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी काल महापौर व महापालिका आयुक्त यांची भेट घेतली. भू-वापर परवाना रद्द करण्याचा बुडा आयुक्तांनी काढलेला आदेश चुकीचा आहे. या खेरीज त्या आदेशामुळे धसका घेतलेल्या इस्माईल मुजावर या आमच्या सहकारी व्यापाऱ्याचे काल हृदयविकाराने निधन झाले. या पद्धतीची दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी बुडा आयुक्तांसह सिदगौडा मोदगी, राजू टोपण्णावर, सुजित मुळगुंद, व्यापारी सदा पाटील, बसनगौडा पाटील, सतीश पाटील आदींवर यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
जय किसान होलसेल भाजी मार्केट संदर्भात अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. हे भाजी मार्केट बेकायदेशीर आहे असा प्रचार केला जात आहे. हे सर्व घडत असताना आम्ही आजपर्यंत गप्प बसलो होतो, मात्र आता आमच्या एका सहकारी व्यापाराचे निधन झाल्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. तेंव्हा सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन जय किसान भाजी मार्केटच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यास परवानगी देऊ नये, अशी आमची विनंती आहे, असे व्यापारी मन्नोळकर यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी आणि शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.






