बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष समितीची नेमणूक केली आहे. या समितीत विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले खासदार, आमदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. सीमाभागातील मराठी माणसांच्या अडचणी लक्षात घेऊन, या तज्ज्ञ समितीने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन येथील जनतेच्या समस्या मांडून त्यावर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे मत कोल्हापूर शिवसेना (उबाठा) नेते विजय देवणे यांनी व्यक्त केले.
आज बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय देवणे म्हणाले, “महाराष्ट्र एकीकरण समितीसमवेत मराठीसाठी कार्य करणाऱ्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांसारख्या पक्षांनी तसेच विविध संघटनांनी विश्वासात घेऊन मराठी माणसाच्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे. मराठी माणसाने भगवा ध्वज हाती घेतल्यास कर्नाटक सरकार त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे.
याला प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. मराठी माणसाला बेळगावात मुक्तपणे श्वास घेता आला पाहिजे आणि आपले काम करता आले पाहिजे, यासाठी महाराष्ट्रातील या तज्ज्ञ समितीने आणि समन्वय समितीने सक्रियपणे काम केले पाहिजे. या समितीतील सदस्यांनी तातडीने बेळगावाला भेट देऊन मराठी भाषिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले.

महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) एकत्रित आले आहेत. आजवर ज्या पद्धतीने शिवसेना सीमावासियांच्या पाठीशी उभी राहिली आहे, त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मराठी माणसाच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभी राहील,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.





