बेळगाव लाईव्ह : हुक्केरी तालुक्यातील इंगळगी गावात गोऱक्षण करणाऱ्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक न केल्यास, येत्या ३ जुलै रोजी ‘चलो इंगळगी’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रीराम सेनेचे राज्याध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांनी दिला.
मंगळवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप केले. जिल्हा पोलीस अधीक्षक हे सरकारचे प्रतिनिधी आहेत की राजकीय व्यक्ती किंवा हल्लेखोरांचे समर्थक, अशाप्रकारे ते विधान करत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
कायद्याचे पालन न करता गोवंश वाहतूक करत असताना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हुक्केरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. अशा परिस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बेजबाबदार विधान करणे योग्य नाही, अलीकडेच हुक्केरी तालुक्यातील इंगळगी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणाला जिल्हा पोलीस अधीक्षक चुकीचे वळण देत आहेत, असे करणे योग्य नाही, असेही कुलकर्णी म्हणाले.

या प्रकरणी एका महिलेने हुक्केरी पोलीस ठाण्याला ३० हजार रुपये दिल्याचा दावा केला आहे, मात्र यानंतरही गोवंशाला गोशाळेत का पाठवले, असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
हुक्केरी पोलीस ठाण्यातून सोडवून आणलेल्या गोवंशाला पुन्हा वाहनातून नेले जात असताना, आमच्या कार्यकर्त्यांना संशय आला. त्यांनी पाठलाग केला असता, त्यांना सापळ्यात अडकवून झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. तरीही जिल्हा पोलीस अधीक्षकांना दया येत नाही का, असा संतप्त सवाल त्यांनी केला.यावेळी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गड्डी, रवी कोकीतकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


