बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी रस्त्यावर वाहने अडवून कागदपत्रांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्याचे वाहतूक पोलिसांचे काम तूर्त थांबवण्याबरोबरच, शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख हणमंत कृष्णा मजूकर यांनी स्वागत केले आहे. त्यांनी पोलिस आयुक्तांचे अभिनंदन करताना शिवसेनेचा पाठिंबा व्यक्त केला.
खडेबाजार येथील शिवसेना कार्यालयात शनिवारी (१२ जुलै २०२५) माध्यमांशी मजूकर बोलत होते. पोलिस आयुक्त बोरसे यांच्या निर्णयाचे स्वागत करताना शिवसेना जिल्हाध्यक्ष हणमंत मजूकर म्हणाले की, “आतापर्यंत बेळगावात ठिकठिकाणी रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना काही ना काही कारणास्तव अडवून नाहक त्रास दिला जात होता. तथापि, आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक व्यवस्थापन केंद्र आणि स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे, त्यांना ऑनलाइन घरपोच चलन पाठवण्यात येणार आहे.”
पोलिस आयुक्तांच्या या निर्णयामुळे वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना अडवून दंड आकारणे या कामातून वाहतूक पोलिसांची मुक्तता होणार आहे. त्यामुळे त्यांना शहरातील वाढती वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्याकडे लक्ष देण्यास अधिक वेळ मिळणार आहे.

याव्यतिरिक्त, शहरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांची यादी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सुपूर्द करून त्या रस्त्यांची दुरुस्ती करवण्याचा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांचा निर्णय देखील अतिशय स्तुत्य आहे. मजूकर यांनी स्पष्ट केले की, “गेल्या १० वर्षांत आजपर्यंत बेळगाव शहरातील वाहतूक आणि रस्त्यांच्या बाबतीत पहिल्यांदाच एखाद्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने अशा पद्धतीचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.”
“समस्त बेळगाव शहरवासीय आणि शिवसेनेतर्फे मी पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे जनहितार्थ कार्यासाठी शिवसेना कायम पोलिस प्रशासनाच्या पाठीशी राहील याची ग्वाही देतो,” असे शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजूकर यांनी शेवटी स्पष्ट केले.




