बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर ते गोवा सीमेपर्यंतच्या (NH 748) राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला विलंब झाल्यामुळे कंत्राटदाराला ₹3.2 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, दुपदरी असलेल्या या 52 किमी लांबीच्या कामाला कंत्राटदारांमुळे विलंब झाला आहे.
या कामापैकी आतापर्यंत 72% काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
खानापूर भागातील 20.8 किमीचे काम पूर्ण झाले आहे आणि तेथे वापरकर्ता शुल्क (टोल) आकारले जात आहे. खानापूर ते कर्नाटक सीमेपर्यंतचे काम पूर्ण न झाल्यामुळे त्या भागातून वापरकर्ता शुल्क घेतले जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


