बेळगाव लाईव्ह विशेष: आज ‘डॉक्टर्स डे’ साजरा होत असताना, बेळगाव लाईव्हने एका अशा कुटुंबाशी संवाद साधला आहे, ज्यांनी पिढ्यानपिढ्या वैद्यकीय सेवेचा वसा जपला आहे. डॉक्टर हे केवळ आजार बरे करत नाहीत, तर ते समाजसेवेचे एक महत्त्वाचे माध्यम आहेत. रुग्णांना जीवनदान देण्यासोबतच, त्यांच्या अडीअडचणीत मदतीचा हात देणारे डॉक्टर्स हे खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत.
अशाच एका बेळगावातील डॉक्टर कुटुंबाने, तब्बल चार पिढ्यांपासून वैद्यकीय क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले असून, त्यांच्या सेवेचा ठसा केवळ बेळगावातच नव्हे, तर गोवा, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक भागांतील रुग्णांवर उमटला आहे.
उचगाव येथील पावशे गल्लीत असलेले पावशे हॉस्पिटल अँड नर्सिंग होम हे या कुटुंबाच्या वैद्यकीय सेवेचे प्रतीक आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी, आजोबा डॉ. परशराम डीकोजी पावशे यांनी कुरुंदवाड सरकारमार्फत उचगाव गावात जुन्या सरकारी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून वैद्यकीय सेवेला सुरुवात केली त्यानंतर आर एम पी डिग्री मिळवत पावशे दवाखान्याची सुरुवात केली.
त्यानंतर त्यांचे चिरंजीव डॉ. वसंतराव परशराम पावशे (डीएसएचएसी ) अशी आयुर्वेदिक पदवी प्राप्त आपल्या वडिलांचा वारसा चालूच ठेवला. आज, डॉ. मोहन पावशे (बीएचएमएस) आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता पावशे (बीएचएमएस) हे तिसऱ्या पिढीतील डॉक्टर रुग्णसेवा करत आहेत. विशेष म्हणजे, या कुटुंबाची चौथी पिढीही याच वैद्यकीय सेवेत सक्रिय आहे. डॉ. मोहन यांचा मोठा मुलगा डॉ. प्रथमेश पावशे याने केएलईमधून एमबीबीएस पूर्ण केले असून, तो सध्या मुंबईतील एमजीएममध्ये एमडीच्या शेवटच्या वर्षात आहे. त्यांची सून डॉ. नम्रता पावशे (देवगेकर) हिने एमबीबीएस पूर्ण करून डीएनबी (जनरल मेडिसिन) केले आहे आणि ती सध्या मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात न्यूरॉलॉजीमध्ये डीएम करत आहे. कुटुंबातील सर्वात तरुण सदस्य डॉ. ऋचा पावशे ही एमबीबीएसच्या बीम्स मध्ये तिसऱ्या वर्षात शिकत असून, नीटची ऑल इंडिया टॉपर आहे.याशिवाय डॉ मोहन पावशे यांच्या भावाची मुलगी डॉ प्रतीक्षा दिनकर पावशे ही बी. एच. एम. एस. एम. डी.(होमिओपॅथी) करत आहे या शिवाय डॉ प्रताप मुकुंद पावशे हे पशु वैद्य म्हणून सेवा निवृत्त झाले आहेत.

डॉ. मोहन पावशे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, “डॉक्टरी पेशा हा जरी एक व्यवसाय असला, तरी अनेक लोक सेवा म्हणून तो करतात. आमच्या आजोबांनी १०० वर्षांपूर्वी ही सेवा सुरू केली. वडील, त्यानंतर मी आणि माझी पत्नी याच पेशात कार्यरत आहोत. माझा मुलगा आणि सून देखील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आमचे पावशे कुटुंब राजकारणातही सक्रिय असले, तरी राजकारणासोबतच समाजकारण म्हणूनही आम्ही पुढाकार घेतला आहे. आजोबांच्या काळापासून सुरू असलेली ही सेवा आज आम्ही, आणि आता आमची मुलेही खांद्यावर घेऊन पुढे नेत आहेत.” ग्रामीण भागात सेवा देण्याचा ध्येय ठेवून आजोबा या क्षेत्रात उतरले होते, असेही त्यांनी नमूद केले. वैद्यकीय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या सीमाभागातील विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करावा, प्रशिक्षण केंद्रातून योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घ्यावे, तसेच वैद्यकीय क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रातील प्रवेश परीक्षेसाठी तयारी करावी. मोबाईल आणि सोशल मीडियापासून शक्य तितके दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

डॉ. स्मिता पावशे यांनी सांगितले, “डॉक्टरी पेशात आमची चौथी पिढी कार्यरत आहे. समाजाला उत्तम वैद्यकीय सेवा देणे हेच आमचे ध्येय असून, आजेसासऱ्यांपासून सुरू असलेली ही सेवा आम्ही आणि भविष्यात आमच्या मुलांनीही पुढे न्यावी.” डॉ. ऋचा पावशे म्हणाल्या, “वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊन सेवा बजावण्यासाठी नवीन डॉक्टर्स घडत आहेत. त्या प्रत्येकाने समाजाला उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे ध्येय बाळगून या क्षेत्रात कार्य करावे आणि वैद्यकीय क्षेत्राचे नाव उज्ज्वल करावे.”

पावशे कुटुंब हे केवळ वैद्यकीय सेवाच देत नाही, तर ते समाजसेवेचा एक आदर्शही घालून देत आहे. त्यांच्या निस्वार्थ वृत्तीमुळेच ते बेळगावातील वैद्यकीय क्षेत्रात एक आदराचे आणि विश्वासाचे स्थान टिकवून आहेत. आजच्या ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने, पावशे कुटुंबाची चार पिढ्यांची ही निस्वार्थ सेवा आणि रुग्णसेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते. केवळ व्यावसायिक यशामागे न लागता, समाजाच्या आरोग्याची जबाबदारी उचलणाऱ्या या कुटुंबाने बेळगावातील वैद्यकीय क्षेत्राला एक नवा आदर्श घालून दिला आहे.


