बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील पश्चिम घाटात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यात तुडुंब भरून वाहणारी कृष्णा नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली असून नदीकाठच्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या जनतेला सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम घाटात होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका चिक्कोडी तालुक्यातील जनतेला बसू लागला आहे. या ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले असून काही ठिकाणचे पूल, बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कृष्णेमधून सध्या वाहत असलेले लाखो क्युसेक पाणी बऱ्याच ठिकाणी पात्र बाहेर पडले आहे. नदीपात्रा बाहेर पडल्यामुळे काटा लगतच्या जमिनी जलमय झाल्या आहेत. तालुक्यातील कल्लोळ गावातील श्री दत्त मंदिरामध्ये नदीचे पाणी घुसले आहे. परिणामी मंदिरातील दैनंदिन पुजाराच्या ठप्प झाली आहे.
चिक्कोडी उपविभागातील जवळपास 8 पुलांवर नदीचे पाणी आले आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन काही पुलांवरील रहदारी बंद करण्यात आली आहे. संबंधित पुल बॅरिकेड्स घालून बंद करण्याबरोबरच त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या जनतेला सावधगिरीचा इशारा देऊनही कांही अतिउत्साही दुचाकी वाहन चालक पुलावर आलेल्या पाण्यातून आपली वाहने दामटत आपला जीव धोक्यात घालताना पाहायला मिळत आहेत.
कृष्णा नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यामुळे नदीकाठच्या लोकांमध्ये घबराट पसरली नदीची पातळी केंव्हा खालावणार याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


