बेळगाव लाईव्ह : जैतनमाळ, खादरवाडी परिसरातील एका शेतात विजेचा धक्का लागून येळ्ळूर गावातील एक लाइनमन मरण पावल्याची दुर्दैवी घटना आज (रविवार) सकाळी घडली. राहुल पाटील (वय 32), रा. येळ्ळूर, असे या लाइनमनचे नाव आहे.
आज सकाळी साधारण 8 वाजता राहुल पाटील हे खादरवाडीजवळील जैतनमाळ भागातील शेतात विजेचे रीडिंग घेण्यासाठी गेले होते.
तिथे रीडिंग घेत असताना, ‘टीपी बॉक्स’मध्ये अचानक वीजप्रवाह आल्याने त्यांना जोरदार धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
राहुल पाटील यांनी अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच आपल्या मुलाचे बारसे साजरे केले होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे येळ्ळूर गावात शोककळा पसरली आहे.
राहुल हे मेहनती आणि जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. विशेष म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांना कन्यारत्नप्राप्ती झाली होती, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


