बेळगाव लाईव्ह :गणेशपूर मेन रोड सैनिक कॉटर्सच्या समोर ‘कचरा फेकू नये’ असा सूचना फलक असून सुध्दा येथे भरमसाठ प्लास्टिक कचरा टाकण्यात येत असून याकडे बेळगाव महापालिकेच्या आरोग्य खात्याने तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गणेशपूर मेन रोड सैनिक कॉटर्सच्या समोर ‘कचरा फेकू नये’ असा सूचना फलक उभारण्यात आला आहे. तथापि अलीकडे नेमक्या या फलकाजवळ रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा टाकला जात आहे. टाकाऊ साहित्यासह शिळे अन्न व अन्य कचरा बांधलेल्या प्लास्टिक पिशव्या या ठिकाणी सातत्याने टाकल्या जात असल्यामुळे रस्त्याशेजारी कचऱ्याचा खच निर्माण झाला आहे.
मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे सध्या रस्त्याच्या संबंधित भागात पसरलेल्या दुर्गंधीमुळे पादचारी आणि दुचाकी वाहनचालकांना नाक मुठीत धरून जावे लागत.

रस्त्यावरून ये-जा करताना दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत असल्याने विशेष करून पादचारी साचलेला कचरा कधी हटवला जाणार याच्या प्रतीक्षेत आहेत
तरी बेळगाव महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गणेशपूर मेन रोड सैनिक कॉटर्सच्या समोरील रस्त्या शेजारच्या साचलेल्या कचऱ्याची तात्काळ उचल करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.


