बेळगाव लाईव्ह : शहापूरमधील बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर चौकादरम्यान दुतर्फा मार्गावरील दुभाजकावर उभारण्यात आलेला, मात्र गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडून असलेल्या टपरी बाजाराला कधी ‘उर्जितावस्था’ प्राप्त होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या या बाजाराला ‘धोबीघाटा’चे स्वरूप आले आहे.
बेळगाव शहरात ‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून शहापूर येथील दुभाजकावर हा टपरी बाजार उभारण्यात आला आहे. यासाठी तब्बल ६ कोटी ५९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहापूर खडेबाजार मार्गावर रस्त्यावर भाजी विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात, या टपरी बाजाराचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली तरी, अद्यापही या टपऱ्यांचे वाटप झालेले नाही. उद्घाटनाअभावी धूळ खात पडलेला हा टपरी बाजार सध्या कपडे वाळवण्यासाठी वापरला जात असल्याने त्याला ‘धोबीघाटा’चे स्वरूप आले आहे.
या टपरी बाजारात ३ बाय ३ आकाराची छोटी दुकाने छोट्या व्यावसायिकांसाठी उभारण्यात आली आहेत. शहापूर खडेबाजार मार्गावरील १३६ भाजी विक्रेत्यांना या टपऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या.

या टपरी बाजारामुळे स्थानिक नागरिक किंवा व्यापाऱ्यांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, उलट देशात एक ‘मॉडेल’ ठरणारा हा बाजार स्थानिक व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देईल, अशी ग्वाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली होती तथापि, काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटूनही हा टपरी बाजार अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मोकळ्यावर असलेला हा बाजार रात्रीच्या वेळी अनधिकृत कृत्यांसाठी ठिकाण बनला आहे, तर बाजाराच्या आजूबाजूच्या लोखंडी जाळ्यांचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जात आहे.
जनतेच्या कररूपी पैशातून बांधण्यात आलेल्या या टपरी बाजाराकडे महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे. धूळ खात पडलेल्या या टपरी बाजाराचे लोकप्रतिनिधींना आता कोणतेच देणेघेणे दिसून येत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा प्रकल्प अजूनही जनतेच्या उपयोगात येत नसल्याने, संबंधित यंत्रणांनी यावर त्वरित लक्ष घालून टपरी बाजार लवकरात लवकर कार्यान्वित करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.


