बेळगाव लाईव्ह :शहराच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरूच असल्यामुळे बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी किल्ला तलाव, अमन नगर, महावीरनगर आणि पंजी बाबा परिसराची नुकतीच सर्वसमावेशक पाहणी करून तेथे साचणारे पाणी, खराब ड्रेनेज व्यवस्था यासारख्या पावसाशी संबंधित समस्या जाणून घेतल्या.
किल्ला (कोटिकेरे) तलावाच्या पाहणीप्रसंगी जवळच्या निवासी भागात ओव्हरफ्लो व पुराची समस्या निर्माण होऊ नये यासाठी तलावाची आणि आजूबाजूच्या नाल्यांची योग्य प्रकारे स्वच्छता केली जाते की नाही याची आमदारांनी खातरजमा करून घेतली. त्याचप्रमाणे, पंजी बाबा, अमननगर आणि महावीरनगर येथे रहिवाशांना खराब ड्रेनेज आणि पाणी चाचण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
ज्यावर आमदार आता मनपा अधिकाऱ्यांशी जलद समन्वय साधून उपाय करत आहेत. पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदारांसोबत युवा नेते अमन सेठ, महानगरपालिका आयुक्त शुभा बी., सहाय्यक कार्यकारी अभियंता अंकित राजेंद्र, अनुप कनोज, उपायुक्त लक्ष्मी एम. सुळगेकर आदी महापालिका व बुडाचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार असिफ सेठ यांनी सर्व ठिकाणी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि अधिकाऱ्यांना त्वरित साफसफाई सुरू करण्याचे आणि इतर नागरी समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. तसेच पावसाळ्याच्या तयारीचे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या नियमित देखभालीचे महत्त्व अधोरेखित केले.

माध्यमांशी बोलताना आमदार सेठ यांनी “पावसाळ्यात वेळेवर हस्तक्षेप आणि सतत देखरेख करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही सर्व रहिवाशांची, विशेषतः सखल आणि पूरग्रस्त भागात, सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे स्पष्ट केले.
पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदारांनी तुंबलेले नाले स्वच्छ करण्यासाठी आणि संवेदनशील भागात पूर रोखण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या. आमदारांची ही सक्रिय भेट त्यांच्या प्रत्यक्ष प्रशासनाच्या वचनबद्धतेवर आणि बेळगाव उत्तर मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन आव्हानांचे निराकरण करण्याच्या त्यांच्या समर्पणावर प्रकाश टाकते.


