बेळगाव लाईव्ह :गेले दोन दिवस पावसाने कहर केल्यामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाल्यांच्या पाणी पातळी कमालीची वाढ झाली असून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कणकुंबी पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला काल मंगळवारी पहिल्यांदाच प्रचंड प्रमाणात पूर आला. परिणामी हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थान मंदिर, तसेच खानापूर शहरानजीकचा नदी घाट पाण्याखाली गेला आहे.
खानापूर तालुक्यात सध्या पावसाचा धुवांधार चालू असून मलप्रभा नदीवरील पुलावर पाणी आल्याने काल कांही काळासाठी वाहतूक बंद झाली होती. खानापूर -हेम्माडगा मार्गावरील मणतुर्गा जवळील हलात्री नाल्यावरही पाणी आले आहे. तसेच तोराळी येथील ब्रिज कम बंधाऱ्यांच्या पुलापर्यंत पाणी आले होते.
जांबोटी, कणकुंबी वगैरे भागात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या या भागातील सर्व नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. नदी नाल्यांवरील लहान मुलांवर पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पावसाचा हैदोस सुरू असताना तालुक्यातील कांही भागात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

कणकुंबी भागात विजेचा लपंडाव सुरू असून या भागातील कांही गावे गेल्या दोन तीन दिवसापासून अंधारात आहेत. आलेला पूर आणि बेळगाव -चोर्ला -गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पूलाचे अर्धवट काम त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक बैलूर व खानापूर मार्गे वळविण्यात आली आहे. याचा फटका जांबोटी, कणकुंबी भागात नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील सर्व धबधबे प्रवाहित झालेले असून वादळीवाऱ्यासह पावसाने हाहाकार माजविला आहे. खानापूर तालुक्याला मे महिन्याच्या मध्यावर मान्सून पूर्व पावसाने जोरदार झोडपले होते त्यामुळे मेच्या मध्यावरच नदी, नाले प्रवाहित झाले होते.
त्यानंतर आता विशेष करून गेल्या सोमवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात होऊन काल मंगळवारी दिवसभर पाऊस मुसळधार कोसळत राहिल्याने पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. खानापूर तालुक्यातील कणकुंबी भागात गेल्या मे महिन्यात 531.8 तर या जून महिन्यात अद्याप 1100 मि.मी.असा एकूण 1640 मि.मी.पाऊस झाला आहे


