बेळगाव लाईव्ह : बेळगावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी, स्थानिक न्यायालयाने आज पाचही आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काकती येथील या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली होती.
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन प्रमुख आरोपींना हिंडलगा कारागृहात पाठवले असून, यात सहभागी असलेल्या दोन अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
आज सकाळी पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले होते. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर, न्यायधीशांनी आरोपींना १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला. यातील तीन सज्ञान आरोपींची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे, तर कायद्यानुसार, अल्पवयीन आरोपींना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे .

दरम्यान, या गंभीर प्रकरणात आणखी एका आरोपीचा शोध एपीएमसी पोलीस करत आहेत. हे प्रकरण एपीएमसी पोलीस ठाण्यातच दाखल करण्यात आले होते आणि पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करत असल्याचे दिसून येत आहे.


