बेळगाव लाईव्ह :कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर या आषाढी पायी वारीत सहभागी होण्यासाठी आज रविवार दि. ८ जून रोजी कर्नाटक अंकली येथील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून आश्वांनी आळंदीकडे प्रस्थान ठेवले .
अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ किलोमीटरचा प्रवास करत मानाचे हिरा व मोती अश्व बुधवार दिनांक १८ जून रोजी माऊली पालखी सोहळा प्रस्थानाच्या एक दिवस अगोदर आळंदी मध्ये पोहोचणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना आषाढी वारीसाठी मान असणारे कर्नाटक अंकली येथील श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार म्हणाले की, आषाढी पायी वारीचे हे १९३ वे वर्ष असून तब्बल ११ दिवसाचा प्रवास करून मानाचे अश्व आळंदीत माऊली पालखी सोहळा प्रस्थानासाठी परंपरेप्रमाणे सहभागी होऊन माऊली चरणी सेवा रुजू करतील.
रविवारी ८ जून रोजी सकाळी १० वाजता माऊलीचे अश्व आळंदीसाठी अंकलीतील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून परिसरातील ग्रामस्थ, भाविक, वारकरी यांच्या उपस्थितीत मार्गस्थ झाले. राजवाड्यातील अंबाबाई मातेच्या मंदिरामध्ये विधिवत पूजन, आरती करून जरीपटका अश्व स्वाराचे मानकरी तुकाराम कोळी यांच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच, हिरा व मोती या अश्वांचे व वाहनांचे पूजन केले गेले. आरती झाल्यानंतर मानाचे अश्व दिंडीसह अंकली येथील राजवाड्यातून आळंदी कडे मार्गस्थ झाले. पहिल्या दिवशीचा मुक्काम सांगली जिल्ह्यातील मिरज येथे व दुसऱ्या दिवशी सोमवार दि. ९ जून रोजी सांगलवाडी, मंगळवार दि. १० रोजी इस्लामपूर पेटनाका, बुधवार दि. ११ रोजी वहागाव, गुरुवार दि. १२ रोजी भरतगाव, शुक्रवार दि. १३ रोजी भुईंज, शनिवार दि. १४ रोजी सारोळा, रविवार दि. १५ रोजी शिंदेवाडी, सोमवार दि. १६ रोजी व मंगळवार १७ रोजी माऊलीच्या अश्वाचा मुक्काम पुण्यामध्ये व १८ रोजी आळंदी येथे असणार असल्याची माहिती श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी सांगितले.
या अश्व प्रस्थान सोहळ्यास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर , माऊलीशेठ गुळुजंकर, राहुल शेठ भोर, सत्यवान भाऊ बवले, अजित मधवे, निखिल कदम यांच्यासह असंख्य वारकरी उपस्थित होते.

अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ कि. मी. चा प्रवास अश्वांसह स्वार आणि त्यांचे पथक यांचा पायी असतो. रोज साधारण ३० कि.मी.चा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो. सायंकाळी नियोजित ठिकाणी मुक्काम केला जातो. मुक्कामाची ठिकाणे परंपरेनुसार ठरलेली असतात. वारी काळात दुपारच्या मुक्कामी माऊलींना आरतीनंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हा मान परंपरेनुसार शितोळे सरकारांकडे असून, या नैवेद्याच्या साहित्याचा ट्रॅक्टरही अंकलीहून याच दिवशी निघणार आहे.
- महादजीराजे शितोळे सरकार (कर्नाटक अंकली)
- स्वाराचे कौशल्य
- पालखी सोबत असलेल्या दोन अश्वांपैकी एक स्वाराचा आणि दुसरा माऊलींचा असतो. स्वारांच्या अश्वावरील तुकाराम कोळी वयाच्या १५ व्या वर्षांपासून वारीला जात आहेत. सलग २७ वर्षे त्यांना हा मान मिळत आहे. तीन उभ्या आणि चार गोल रिंगणात त्यांचे कौशल्य दिसून येते.