बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील इटगी क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात रस्त्याच्या कामावर असलेल्या चार मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुभाजकाचे काम करत असलेल्या या गरीब कामगारांना एका अनियंत्रित लॉरीने चिरडले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पहाटेपासून रस्त्याच्या विकासाचे काम करत असलेल्या कामगारांना भरधाव वेगात आलेल्या लॉरीने धडक दिली.
या घटनेमुळे तात्काळ चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच कित्तूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.
अपघातग्रस्त टँकर लॉरी राष्ट्रीय महामार्गावरून सर्व्हिस रोडवर उलटल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात ऑइलची गळती सुरू झाली आहे. यामुळे घटनास्थळी भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. कित्तूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


