बेळगाव लाईव्ह :खादरवाडी गावच्या खराब झालेल्या मुख्य रस्त्याचे अर्धवट अवस्थेतील विकास काम तात्काळ पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असल्यामुळे येत्या 18 जून श्री मरगाई यात्रेपूर्वी ते काम पूर्ण केले जावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
खादरवाडी गावचा मुख्य रस्त्याची वर्षभरापूर्वी खाचखळगे पडून दुर्दशा झाली होती. त्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने आवाज उठवून केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर 1.80 कि.मी. अंतराच्या रस्त्याचे विकास काम हाती घेण्यात आले होते.
तथापि हे विकास काम पूर्ण न करता अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. परिणामी अर्धा सुस्थितीत, अर्धा खराब अशा अवस्थेत असलेल्या या रस्त्यावरून ये-जा करताना वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. याखेरीज वाताहत झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
या संदर्भात खादरवाडी गावकऱ्यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून गावातील मुख्य रस्त्याचा लवकरात लवकर संपूर्ण विकास केला जावा अशी मागणी केली होती.
त्यांच्या या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खादरवाडी गावातील मुख्य रस्त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध झालेला असताना देखील त्याचा संपूर्ण विकास करण्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे? असा जाब विचारून उपलब्ध तरतुदीखाली तात्काळ कार्यवाही केली जावी, असा आदेश जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावला आहे.
त्यामुळे खादरवाडीवासियांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी रस्त्याचे अर्धवट असलेले विकास काम येत्या 18 जून श्री मरगाई यात्रेपूर्वी पूर्ण केले जावे, अशी जोरदार मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.


