बेळगाव लाईव्ह :दरवर्षी पावसाळ्यामध्ये शहरातील बळ्ळारी नाला व लेंडी नाल्याला पूर येऊन शेत पिकांची प्रचंड हानी होण्याबरोबरच कांही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत होते. या पार्श्वभूमीवर बेळगाव शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष नारायण सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज बेळगाव महापालिका सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या अध्यक्षांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन बळ्ळारी व लेंडी नाल्याच्या तात्काळ स्वच्छतेसह त्यांच्या विकासाची गरज व्यक्त केली.
बेळगाव महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीचे औचित्य साधून बेळगाव शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती यांची भेट घेतली. सदर भेटी प्रसंगी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या अध्यक्ष नारायण सावंत यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी बळ्ळारी नाला व लेंडी नाल्याची साफसफाई आणि रुंदीकरणासह त्यांचा विकास साधला जाणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले.
यावेळी सावंत यांनी नाल्यांचा नकाशा अध्यक्षांसमोर मांडून कशाप्रकारे नाल्याची दुरावस्था झाली आहे याची माहिती दिली. सदर नाल्यांमध्ये करण्यात आलेले अतिक्रमनण हटवून त्यांची रुंदी वाढवल्याखेरीज पुराची समस्या निकालात निघणार नाही, असेही सावंत यांनी सांगितले.
महानगरपालिकेला दिलेल्या भेटीनंतर बेळगाव लाईव्हला माहिती देताना बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत म्हणाले की, बेळगाव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेली दहा ते पंधरा वर्षे आम्ही शहरातील लेंडी नाला आणि बळ्ळारी नाल्याच्या समस्येचा पाठपुरावा करत आहोत. दरवर्षी नाला स्वच्छतेच्या नावाखाली प्रचंड मोठा खर्च दाखवला जातो. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही नाल्यांची व्यवस्थित स्वच्छता केली जात नाही. यासंदर्भात आज महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीप्रसंगी आम्ही स्थायी समितीच्या अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली. तेंव्हा त्यांनी लागलीच प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

तथापी सदर नाल्यांची रुंदी वाढवून त्यांचा विकास केल्याखेरीज पावसाळ्यात पाणी तुंबून पूर परिस्थिती निर्माण होण्याची समस्या मिटणार नसल्याचे आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे. या नाल्यांमध्ये जे अतिक्रमण झाले आहे ते हटवल्याखेरीज नाला स्वच्छ होणार नाही आणि जोपर्यंत स्वच्छ विस्तृत नाल्यातून शहरातील घाण बाहेर फेकली जाणार नाही तोपर्यंत बेळगाव आरोग्यपूर्ण राहणार नाही, हे आम्ही गंभीरपणे नमूद केले आहे. याखेरीज विकासा अभावी पावसाळ्यात या दोन्ही नाल्यांचे पाणी आसपासच्या शेतजमिनींमध्ये शिरत असल्यामुळे पिकांचे नुकसान होऊन बेळगाव परिसरातील कृषी व्यवसाय डबघाईला आला आहे. नाल्याच्या पुरामुळे पिकांचे नुकसान होऊन मोठा आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शेतजमिनी सहा -सहा महिने पावसाच्या पाण्याखाली राहत असल्यामुळे दुसरे पीकही घेता येत नाही.
अस्वच्छ नाल्यांमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज आम्ही महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती अध्यक्षांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यांनी तात्काळ उद्यापासून जेसीबी वगैरे आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नालेसफाईचे काम हाती घेतले जाईल असे आश्वासन दिले आहे अशी माहिती देऊन नाल्याच्या आसपास असणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांनी देखील या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन नारायण सावंत यांनी शेवटी केले.


