बेळगाव लाईव्ह : मराठी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सीमाभागातील मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
सीमाभागात मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती गेली आठ वर्षे सलगपणे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत आहे.
२०२५ मध्येही या उपक्रमाची पुनरावृत्ती करण्यात येणार असून, इयत्ता पहिलीमध्ये मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या १५ जून २०२५ पर्यंत मागवण्यात येत आहे.
शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, आजी-माजी विद्यार्थी किंवा संबंधित गावांतील युवा समिती कार्यकर्त्यांनी ही माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे व्हॉट्सॲपवर किंवा कार्यालयीन पत्त्यावर सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ज्या शाळांमध्ये पहिलीची पटसंख्या वाढली आहे, अशा शाळांचा विशेष सन्मान समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.



