बेळगाव लाईव्ह :बेंगलोर येथे परवा आरसीबी क्रिकेट संघाच्या विजयोत्सादरम्यान दुर्घटना घडून 11 जणांचा बळी जाण्यास राज्यातील काँग्रेस सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत बेळगाव महानगर व जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे आज सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन छेडून निषेध नोंदवण्यात आला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आरसीबी संघाने तब्बल 18 वर्षांनी आयपीएल चषक पटकावल्यानंतर गेल्या बुधवारी बेंगलोर मध्ये आयोजलेल्या विजयोत्सवाला दुर्घटनेचे गालबोट लागून चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला सर्वस्वी राज्यातील काँग्रेस सरकारचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याचा आरोप करत बेळगाव महानगर व जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे आज सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचा ध्वज आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व गृहमंत्री जी. परमेश्वर यांची लाल शाईने खुल्या मारलेली निषेधाची छायाचित्रे धरून जोरदार निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांसह सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत न्यायाची मागणी करण्यात येत होती. निदर्शने केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यानंतर राणी चन्नम्मा चौकात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची छायाचित्रे फाडून टाकत आपला संताप व्यक्त केला.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना भाजप नेत्या शिल्पा केंकरे म्हणाल्या की, बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम येथे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडवून 11 जणांचा बळी जाण्यास संपूर्णपणे राज्यातील काँग्रेस सरकार जबाबदार आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी ते आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करून त्यांना निलंबित करत आहेत.
आपली चूक लपवण्यासाठी हे केले जात आहे. विजयोत्सवाला प्रचंड संख्येने लोक येणार तेंव्हा योग्य नियोजन आवश्यक आहे हे सरकारला कळाले नाही का? आरसीबी संघातील खेळाडूंच्या स्वागत समारंभात सहकुटुंब गर्क असलेल्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या अन्य नेतेमंडळींचे स्टेडियम बाहेर लाखोच्या संख्येने लोकांची काळजी घेणे हे कर्तव्य नव्हते का? आपला बेजबाबदारपणा लपवण्यासाठी आता त्यांच्याकडून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात असून हे चुकीचे आहे.
त्यासाठीच आज आम्ही येथे आंदोलन करत आहोत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना जबाबदारी आणि नैतिकतेचे थोडे जरी भान असेल तर त्यांनी आपली चूक मान्य करावयास हवी. मात्र हे करण्याऐवजी ते आपली चूक पोलीस अधिकारी आणि संयोजकांच्या नावावर ढकलत आहेत हे अत्यंत गैर आहे असे नमूद करून जर हिम्मत असेल तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्यात थोडी तरी नैतिकता असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन खुर्च्या खाली कराव्यात, असे मत शिल्पा केंकरे यांनी व्यक्त केले.