बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यामधील यमकणमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंगळगी गावामध्ये घडलेल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना लोकांच्या जमावाने झाडाला बांधून मारहाण केल्याच्या घटने संदर्भात पोलिसांनी हिंदू व मुस्लिम समाजातील 4 जणांना अटक केली आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
आपल्या कार्यालयामध्ये आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. गुळेद यांनी सांगितले की, हुक्केरी तालुक्यातील इंगळगी गावात श्रीराम सेनेच्या पाच कार्यकर्त्यांना झाडाला बांधून लोकांनी त्यांना मारहाण केल्याची घटना गेल्या रविवारी घडली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या घटनेनंतर पोलीस खात्यावर देखील प्रश्न उपस्थित झाले होते. याप्रकरणी कुणीही तक्रार दाखल न केल्यामुळे आम्ही स्वतःहून तक्रार दाखल करून घेतली आहे.
घटनेची माहिती अशी की गाईंना कसाही खाण्याला घेऊन जात असल्याच्या संशयावरून 26 जून रोजी श्रीराम सेनेचे पाच जण एका वाहनाचा पाठलाग करतात. त्यावेळी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि टेम्पो चालकात बाचाबाची होते. वादावादी विकोपाला जाऊन वाहन चालक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते पोलिसांकडे येतात. त्यावेळी वाहनात पाच जनावरे आढळल्यामुळे पोलिसांनी विचारणा केले असता. वाहन चालक कागदपत्रे सादर करून ती जनावरे जत्रेमधून खरेदी करण्यात आली आहेत. ती जनावर आम्ही घरात पाळण्यासाठी घेऊन जात आहोत, असे स्पष्टीकरण देतो. त्यानंतर श्रीराम सेनेचे कार्यकर्ते आम्हाला संशय आला म्हणून आम्ही गाडी पकडली होती. आता संशय दूर झाला आहे आम्ही आमची तक्रार मागे घेतो असे सांगून तसे लेखी लिहून देतात आणि प्रकरण आपसात मिटवून पोलीस स्टेशन मधून निघून जातात. तथापि शहानिशा करण्यासाठी जनावरे गोशाळेत ठेवली जातात. पुढे 27 आणि 28 जून रोजी कोणतीही पोलीस तक्रार न झाल्यामुळे गाईंचा मालक बाबूसाब मुल्तानी खर्च देऊन त्या गाई गोशाळेतून सोडवून आपल्या घरी घेऊन जातो.

या घटनेनंतर श्री राम सेनेचे कार्यकर्ते पुन्हा ती जनावरे कसाई खाण्याला घेऊन जात असल्याच्या संशयावरून मुल्तानीच्या घरी जातात. त्यावेळी बाबूसाब मुल्तानी घराबाहेर घरात त्याच्या कुटुंबातील केवळ महिला असतात. श्रीराम सेनेचे कार्यकर्ते घरात घुसताच घाबरलेल्या त्या महिला आरडाओरड करतात. परिणामी घटनास्थळी जमलेल्या संतप्त ग्रामस्थांकडून त्या पाचही कार्यकर्त्यांना चौकातील झाडाला बांधून मारहाण करण्याची घटना घडते. दरम्यान तक्रार आली नसल्यामुळे पोलिसांना याची कोणतीच माहिती नसते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारलेली घटना पोलिसांना कळते त्याआधी या घटनेची कल्पना नसल्यामुळे दोन्हीकडून लिहून घेऊन सोडून देण्यात आले होते. आता मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतला आहे तसेच याप्रकरणी चार जणांना आम्ही अटक केली आहे. मारहाण प्रकरणी एक हिंदू आणि तीन मुस्लिम लोकांना अटक करण्यात आली आहे, असे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले.
तसेच सोशल मीडियावर मुस्लिम लोकांनी गोरक्षकांवर हल्ला केला अशी धादांत खोटी, दिशाभूल करणारी बातमी व्हायरल करण्यात आली आहे. कारण ते गोरक्षक असतील तर अद्याप त्यांनी पोलिसांना कोणतीही तक्रार का दिली नाही. त्यांनी स्वतःच ती जनावरे कसाई खाण्याला नेण्यात येत नव्हती असे पोलीस स्थानकाला लिहून दिले आहे. श्रीराम सेनेचे कार्यकर्ते पैसे वसुली करत आहेत अशी देखील तक्रार आली आहे. मात्र अद्याप याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही कुणी तक्रार दिलेली नाही. मुळात गाईंचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांना कल्पना एखाद्याच्या घरात जबरदस्तीने घुसणे हा देखील गुन्हाच आहे. कोणीही कायदा हातात घेता कामा नये. महिला घरी एकट्या असताना त्यांच्या घरात प्रवेश करणे हे बेकायदेशीर आहे. जर तसे घडले तर संबंधितांनी पोलिसांना याबाबत कल्पना देणे गरजेचे आहे. तसेच लोकांनी ही कायदा हातात घेऊन कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण करणे देखील बेकायदेशीर आहे, असे स्पष्टीकरण देखील डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनी केले.
पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोपबद्दल बोलताना श्रीराम सेनेच्या संबंधित 5 कार्यकर्त्यांपैकी एक असलेला महावीर सोलापूर हा रावडी शिटर असून कायदेशीररित्या त्याला बेळगाव जिल्ह्यातून कलबुर्गी जिल्ह्यात तडीपार करण्यात आले आहे. तसेच त्याबाबतची माहिती कलबुर्गी पोलिसांना देण्यात आली आहे ही वस्तुस्थिती असताना कायद्याचे उल्लंघन करून संबंधित तडीपार रावडी शिटरचे पुन्हा बेळगाव जिल्ह्यात येण्याचे कारण काय होते? समाजासाठी घातक असलेले असे गुंड एखादी संघटना आपल्या मदतीस यावी म्हणून त्या संघटनेच्या नावावर कोणतीही कथा रचू शकतात. हे समाजकंटक कोणत्याही संघटनेचे नाव सांगून जर काहीही करत असतील तर ते कितपत योग्य आहे? स्वतः श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना आमची कोणतीही तक्रार नाही असे लेखी लिहून दिली आहे. त्यामुळे तक्रार नोंदवून घेण्याचा प्रश्नच येत नाही, असेही जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केले.


