बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील मुळशी, पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज जागृत झाला असून तेथील काही शहरातील मराठा समाजाने लग्नाच्या बाबतीत आदर्शवत आचार संहिता जाहीर केली आहे. याचा बोध शिक्षण, उद्योग, व्यवसाय याकडे दुर्लक्ष करून लग्नसमारंभावर लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या बेळगाव सीमाभागातील मराठा समाजाने घेण्याची गरज असून यासाठी समाज धुरीनांसह बेळगावच्या सकल मराठा समाजाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे मृत्यु प्रकरणानंतर येथील मराठा समाजामध्ये लग्नातील वाढता खर्च, मानपान, भपकेबाजपणा, वायफळ खर्च, पैशाची उधळपट्टी, श्रीमंतीचे प्रदर्शन या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार मंथन सुरू झाले आहे. याचे अनुकरण सीमा भागातील मराठा समाजाने गरजेचे झाले आहे कारण विमा भागातील मराठा समाजातील लग्नांचे स्वरूप अलीकडे झपाट्याने बदलत चालले आहे आपले कुटुंबीय, सगेसोयरीक आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत घरासमोर होणारे लग्न आता कालवाह्य ठरत चालले आहे.
घराच्या दारात होणारी लग्ने आता मंगल कार्यालय आणि रिसॉर्ट मध्ये केली जात आहेत. यातून लाखो रुपयांची उधळपट्टी होत असल्यामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी बनत आहेत. अलीकडच्या काळात सीमा भागातील मराठा समाजामधील काहीजण कारखानदारी उद्योग व्यवसायात स्थिरावत असले तरी येथील मराठा समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. त्यामुळे हा समाज आर्थिक दृष्ट्या तसा मागासलेलाच आहे. यात भर म्हणून शिक्षण उद्योग व्यवसाय यांच्या माध्यमातून उत्कर्ष साधण्याऐवजी सीमा भागातील मराठी समाज प्रामुख्याने लग्न समारंभ, यात्रा, वाढदिवस, जेवणावळी यामध्येच जास्त गुंतत चालल्याचे निदर्शनास येते. यामध्ये लग्नाची समस्या प्रामुख्याने जटील बनत चालली आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात सध्या सुरू असलेल्या वैचारिक घुसळणीचा प्रयत्न सीमाभागात देखील होणे अत्यावश्यक बनले आहे. यासंदर्भात चर्चा, जागृती, प्रबोधन, मार्गदर्शन वगैरेंच्या माध्यमातून आपला समाज वाचवण्यासाठी मराठा समाजातील धुरीनांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून सर्वांना बेळगावच्या मराठा समाज सुधारणा मंडळाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी प्राचार्य विचारवंत आनंद मेणसे यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. त्याचे अनुकरण सीमा भागातील मराठा समाजाने देखील करणे आवश्यक असून त्यासाठी व्यापक बैठक घेऊन जागृती करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा समाजाने आपल्या समाजाची लग्नविषयक जी आचारसंहिता जारी केली आहे ती खरोखर उत्तम आहे. उशिरा का होईना मराठा समाजाला लग्नविषयक मार्गदर्शन त्यामुळे होणार आहे.
बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्राचाच असल्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाने लग्नासंदर्भात जी काही आचारसंहिता सुचवली आहे ती आपण स्वीकारावयास हवी. कारण गेल्या कांही वर्षापासून येथील मराठा समाजामध्ये जे विवाह सोहळे होत आहेत ते खरोखरच चिंताजनक आहेत. येथील मराठा समाजातील लग्न वेळेवर लागत नाहीत, शिवाय लग्नासाठी भरमसाठ खर्च केला जातो. परिणामी त्यासाठी कर्ज काढले जाते आणि लग्नानंतर वधू अथवा वराचे कुटुंबीय कर्जफेडीच्या विवंचनेत पडतात. यासाठी बेळगाव सीमाभागातील मराठा समाज सुधारणा मंडळ या संस्थेने पुढाकार घ्यावयास हवा. त्याने समस्त मराठा समाजाचे एक संमेलन घेऊन त्यामध्ये हा विषय मांडावा. थोडक्यात बेळगाव सीमा भागातील मराठा समाजाला लग्न समारंभाच्या बाबतीत एक चांगले विधायक वळण लावणे ही काळाची गरज बनली आहे. लग्नासाठी कर्ज काढल्यामुळे संबंधित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला आहे. कर्जाची फेड करताना मुलांचा वाढता शैक्षणिक खर्च झेपेणासा होऊ लागल्यामुळे मुलांचे शिक्षण थांबत आहे. हे आपण टाळलं पाहिजे असे सांगून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची माहिती देताना लग्नातील हुंड्याच्या प्रथेला आता बाजारी स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे लग्नात मुलीकडून हुंडा घेण्याची प्रथा बंद झाली पाहिजे असे सांगून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारा प्रमाणे अतिशय साध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये पवित्र मांगल्य राखून लग्न सोहळे केले जावेत. एकंदर महाराष्ट्रातील मराठा समाजाने लग्नाच्या बाबतीत जी आचारसंहिता जारी केली आहे ती आपण बेळगावसह सीमा भागातही जारी केली पाहिजे, असे स्पष्ट मत माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.
साहित्यिक गुणवंत पाटील म्हणाले की, लग्न सोहळा हा प्रत्येक कुटुंबासाठी सांस्कृतिक सोहळा आणि वैयक्तिक बाब असते तथापि हा सोहळा जेव्हा सार्वजनिक केला जातो तेंव्हा जो अवास्तव खर्च होतो. त्यासोबत ज्या अनिष्ट प्रथा येतात. त्या टाळण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाने जी आचारसंहिता लागू केली आहे ती या समाजासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण अवास्तव खर्चामुळे बऱ्याच जणांना कर्जबाजारी व्हावे लागले आहे. जमिनी विकाव्या लागल्या आहेत. एकंदर पैशासोबतच वेळेचा अपव्यय येऊन मानसिक स्वास्थ हरवत आहे. त्यामुळे मराठा समाजाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. जर आपल्याला चांगला मार्ग निवडायचा असेल, योग्य दिशेला समाजाला न्यावयाचे असेल तर महाराष्ट्रात मराठा समाजासाठी जी आचार संहिता लागू करण्यात आली आहे तिचे आपण अनुकरण करणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम सर्वसामान्य मराठी बांधव ज्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात त्या मराठा समाजातील मोठ्या प्रमाणात पैसा असलेल्या घटकांना समजावण्याची गरज आहे. लग्नाच्या आचार संहितेचे पालन करून वाचलेला पैसा वधू-वरांच्या नावे केल्यास त्यांचेही भवितव्य चांगले घडू शकते म्हणूनच महाराष्ट्रातील मराठा समाजाची लग्न आचारसंहिता निश्चितच महत्त्वाची आहे, असे गुणवंत पाटील यांनी नमूद केले.