बेळगाव लाईव्ह : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुन्या यांसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी दिले आहेत. जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या आरोग्य विभागाच्या ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमा’च्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते.
पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने पंचायत राज विभाग आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम करून या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, धूर फवारणी करणे आणि जनजागृती करणे यावर भर देण्याची गरज आहे. या बैठकीत ‘गृह आरोग्य’ कार्यक्रमावरही चर्चा झाली. मधुमेह आणि रक्तदाब या आजारांसाठी जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, लवकरच या कार्यक्रमांतर्गत घरोघरी औषधे वितरित केली जाणार आहेत. यासोबतच, या कार्यक्रमात कर्करोगाची प्राथमिक तपासणी करण्याची सोय देखील उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि समुदाय आरोग्य केंद्रांमधील शस्त्रक्रिया कक्ष आणि प्रसूती कक्ष अद्ययावत आणि सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही सीईओ शिंदे यांनी दिले. रायबाग येथील शासकीय रुग्णालयात लवकरच शुद्ध पाणी पुरवठा युनिट सुरू करण्यात येणार आहे. तसेच, चिकोडी आणि गोकाक तालुक्यात ‘मेगा आरोग्य मेळावे’ आयोजित करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. बंगळूरु येथील पोषण आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा संचालनालयाच्या उपसंचालक डॉ. इंदिरा कबाडे यांनी जिल्ह्यातील पोषण पुनर्वसन केंद्रांच्या कार्याची माहिती दिली. कमी वजनाच्या आणि कुपोषित बालकांना या केंद्रांमध्ये योग्य उपचार मिळत असून, गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला जि.प. उपसचिव बसवराज अडवीमठ, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. आय.पी. गडाद, अतिरिक्त जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस.एस. गडेद, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. चांदनी देवडी, जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी डॉ. गीता कांबळे, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी, जिल्हा रोगवाहक आश्रितरोग नियंत्रण अधिकारी डॉ. विवेक होन्नळ्ळी, प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. सायनवर यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी आणि शासकीय रुग्णालयांचे प्रमुख उपस्थित होते.