बेळगाव लाईव्ह :उष्णतेमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे हैराण झालेल्या सीमावर्ती भागातील लोकांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे.
शेजारच्या महाराष्ट्रातील कोल्हापुर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसह चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यात झालेल्या पावसामुळे सीमावर्ती कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांची पाण्याची पातळी 4 फूटांनी वाढली आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीसह तिच्या उपनद्यांना जीवदान मिळाले आहे. संततधार पावसामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाण्याची पातळी सुमारे 4 फूटांनी वाढली आहे.
येथील सखल भागात पाणी साचून तळी निर्माण होत आहेत. चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यातील नदीकाठच्या लोकांना आणि गावांना रविवारी पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागला होता. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची पातळी वाढल्याने लोक आनंदी आहेत.
यापूर्वी तीन-चार दमदार वळीव झाल्यानंतर निपाणीमध्ये काल गुरुवारी दिवसभर मान्सूनपूर्व पावसाची संततधार राहिली होती. परिणामी या भागातील ओढे, नाले, तलावांच्या पातळीत वाढ होत असून तालुका प्रशासन सतर्क झाले आहे.
तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास नियंत्रणासाठी प्रशासनाने नदीकाठावरील गावांसाठी 11 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गेल्या दोन दिवसात सीमा भागातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दूधगंगा खोऱ्यात गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.




