बेळगाव लाईव्ह : भारतीय रेल्वेच्या वतीने मान्सूनपूर्व तयारी आणि सुरक्षितता उपाययोजनांचा भाग म्हणून, महाव्यवस्थापक मुकुल सरन माथूर यांनी कोकण रेल्वे मार्गाची कसून पाहणी केली.
प्रवासादरम्यान त्यांनी सुरक्षितता मापदंडांचा आढावा घेतला आणि कॅसरलॉक रेल्वे स्थानकाची तपासणी केली. मान्सून हंगामासाठी आवश्यक असलेल्या रेल्वे रुळ आणि इतर साहित्यांची सज्जता सुनिश्चित करण्यावरही त्यांनी चर्चा केली.
याच दौऱ्यात, महाव्यवस्थापक माथूर यांनी कारंझोल स्थानकावर सिग्नल पॉईंट्सची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आरडीएसओ टीम, पीएचओडी अधिकारी, हुबळीच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका श्रीमती बेला मीना आणि इतर शाखा अधिकारी उपस्थित होते.

सिग्नल ठिकाणी चेक रेल्स बसवण्याबाबत आणि ट्रॅक वक्रता कमी करण्याच्या उपाययोजनांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली असून रेल्वे मंत्रालयाच्या या पाहणी दौऱ्यामुळे आगामी मान्सून हंगामात रेल्वे वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर भर देण्यात आला आहे.
गेल्या दोन चार दिवसांपूर्वी कॅसरलॉक रेल्वे डबा रुळावरून घसरला होता त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती आगामी पावसाळ्यात दरड कोसळणे किंवा लहान-मोठे संभाव्य अपघात लक्षात घेता रेल्वे अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी केली आहे.




