बेळगाव लाईव्ह :फूटपाथवर नग्नावस्थेत बसलेल्या एका मनोरुग्ण इसमाची विचारपूस करून समाजसेवक संतोष दरेकर व टिळकवाडी पोलिसांनी त्याला आसरा मिळवून दिल्याची माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना आज टिळकवाडी येथे घडली.
थोडक्यात माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना टिळकवाडी येथील सेंट्रा केअर हॉस्पिटलसमोरील काँग्रेस रोडवर पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे गेटच्या दरम्यान एक नग्न व मानसिकदृष्ट्या अस्वस्थ बेघर इसम फूटपाथवर बसलेला आढळला.
परिस्थिती लक्षात येताच फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमचे प्रमुख दरेकर यांनी ताबडतोब टिळकवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक परशुराम पुजेरी यांना माहिती दिली. तेंव्हा तातडीने कार्यवाही करताना पोलिस निरीक्षक पुजेरी यांनी पोलीस कर्मचारी बी. बी. तिपन्नावर यांना त्या ठिकाणी पाठवले. त्याच वेळी ही बाब पोलिस नियंत्रण कक्षालाही कळवण्यात आली.

दरम्यान दरेकर यांचे मित्र स्थानिक रहिवासी सुरेश कांबळे यांनी त्यांच्या घरातून कपडे आणले, जे त्या मनोरुग्ण इसमाच्या अंगावर चढवण्यात आले. त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी तिपन्नावर यांनी त्या इसमाला अन्नपाणी पुरवले. त्यानंतर त्याला पोलिस नियंत्रण कक्षाच्या वाहनातून नेण्यात आले आणि पुढील देखभाल व पुनर्वसनासाठी एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेकडे (एनजीओ) सोपवण्यात आले.
सदर घटनेत जलद मदत केल्याबद्दल संतोष दरेकर यांनी टिळकवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.