बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात दरवर्षी शिवजयंतीनिमित्त मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने राजहंसगड चढणे-उतरणे स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षीही ही स्पर्धा रविवारी ४ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यामध्ये लहान गट, मध्यम गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
लहान गटातील मुलींपैकी प्रांजल धुडूम हिला प्रथम, मुस्कान शेख हिला द्वितीय आणि सोमय्या शेख हिला तृतीय क्रमांक मिळाला. लहान गटातील मुलांमध्ये प्रणव बेनके प्रथम, संदीप राजपूत द्वितीय, तर भरत बेलपुल तृतीय क्रमांकावर राहिला. मध्यम गटामध्ये मुलींमध्ये प्रणाली मोदगेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलांमध्ये शिवम कोपर्डे प्रथम, प्रीतम कुरबर द्वितीय आणि अथर्व सायनेकर तृतीय क्रमांकावर आले. खुल्या गटातील मुलींमध्ये प्रतीक्षा कुरबर हिला प्रथम क्रमांक मिळाला आणि मुलांमध्ये प्रणव प्रजापती प्रथम क्रमांकावर, किसन टक्केकर व गणेश सालगुडे हे संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांकावर राहिले.
या स्पर्धेनंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी भूषवले. यावेळी व्यासपीठावर शहापूर विभागाचे अध्यक्ष नेताजी जाधव, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, मध्यवर्तीचे कार्यवाह विजय पाटील, सरचिटणीस श्रीकांत कदम, जनसंपर्क प्रमुख विकास कलगटगी, ग्रामपंचायत सदस्य विजय बाळेकुंद्री आणि मोतेश बारदेशकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आणि पूजन करून करण्यात आली. प्रारंभी कार्यवाह मदन बामणे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. सूत्रसंचालनही त्यांनीच केले. विकास कलगटगी यांनी आभार मानले.

या वेळी बोलताना अंकुश केसरकर यांनी दोन वर्षे निवडणुकांमुळे ही स्पर्धा झाली नव्हती, मात्र यंदा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन करताना त्यांनी यापुढेही ही स्पर्धा सातत्याने घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली.
नेताजी जाधव यांनी स्पर्धेचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा असल्याचे सांगून खेळामुळे मिळणाऱ्या सरकारी नोकरीच्या संधींवर भर दिला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली. शेवटी विजेत्यांना रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राजू ओऊळकर, सुनील आनंदाचे, बाबू कोले, प्रकाश गडकरी, आकाश भेकणे आणि प्रतीक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्वराज्य काकतकर याचा विशेष सन्मान
आठ वर्षे पूर्ण न झालेल्या पण स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या स्वराज्य काकतकर यांने राजहंसगड चढणे व उतरणे ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने त्याचा रोख पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह देऊन विशेष सन्मान केला. याबद्दल उपस्थितानी त्याचे भरभरून कौतुक केले.