बेळगाव लाईव्ह :नवीन शैक्षणिक वर्षाला आज गुरुवारपासून प्रारंभ झाल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सामसूम असलेल्या शहर उपनगरातील शाळा मुलांच्या कलकलाटासह पुन्हा गजबजून गेल्या आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज नवीन शैक्षणिक वर्षासह शाळा सुरू होणार असल्यामुळे कालपासूनच मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे काल सायंकाळी दप्तर, गणवेश वगैरेंची तयारी करून सज्ज असलेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या गर्दीमुळे आज गुरुवारी सकाळी शहर उपनगरातील विविध शाळांची आवारे फुलून गेली होती.
शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे कांही पालक आपल्या मुलांना सोडण्यासाठी शाळेपर्यंत आल्याचे पहावयास मिळत होते. पहिला दिवस असल्यामुळे कांही शाळा व्यवस्थापनाकडून शाळेत येणाऱ्या मुलांचे स्वागत करण्यात येत होते.
शाळेत प्रवेश करताच उत्सुक विद्यार्थी -विद्यार्थिनींमध्ये आपला नवा वर्ग शोधण्याची आणि वर्गात जाऊन बेंचवरील आपली जागा पकडण्यासाठी धावपळ उडाल्याचे पहावयास मिळत होते.
दरम्यान, सरकारी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने येत्या दि. 1 ते दि. 15 जून 2025 दरम्यान नोंदणी केली जाणार आहे. त्याचबरोबर दि. 1 ते दि. 20 जून दरम्यान मागील वर्षाचा अभ्यासक्रम यासाठी सेतुबंध कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.
अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असून त्यांच्याकडून पुस्तके व गणवेश पुरवठा, तसेच अन्य तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मध्यान्ह आहारासाठी स्वयंपाक खोली, स्वयंपाकाची भांडी, तसेच इतर साहित्यांची स्वच्छता करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना देखील शिक्षण विभागाने केली आहे.