बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून भूषण गुलाबराव बोरसे यांनी काल शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर आज सकाळी शहापूर प्रभाग क्र. 27 चे नगरसेवक रवी साळुंखे यांनी त्यांचे अभिनंदन करून बेळगावात स्वागत केले.
बेळगाव महापालिकेतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आज शनिवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात जाऊन शहराचे नूतन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक साळुंखे यांनी बेळगाव पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल बोरसे यांचे शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी नगरसेवक रवी साळुंखे यांनी बेळगावातील परिस्थिती व घडामोडींची नूतन पोलीस आयुक्तांना थोडक्यात माहिती दिली. चर्चेप्रसंगी मूळचे धुळे, महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी संवाद साधला.
बेळगावमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून प्रामुख्याने गांजा विक्रीचे प्रमाण वाढले आहे. गांजामुळे शहरातील युवा पिढी व्यसनाधीन होत असून भान हरपलेला युवावर्ग गैरप्रकार करू लागला आहे. तेंव्हा सर्वप्रथम शहरात फोफावलेल्या गांजा विक्रीला पायबंद घालावा. त्यानंतर रामभरोसे सुरू असलेल्या शहरातील बेबंद रहदारीला शिस्त लावावी.

त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील जनतेच्या तक्रारी, समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील जनतेशी, सामाजिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम सातत्याने राबवावा अशी विनंती करून एकेकाळी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक हेमंत निंबाळकर यांनी बेळगावातील गुन्हेगारी संपुष्टात आणून जसा वचक निर्माण केला होता तसा वचक आपल्याबद्दल चांगले ऐकले असल्यामुळे आपण निर्माण करावा अशी शहरवासीयांची इच्छा आहे, असे नगरसेवक रवी साळुंखे यांनी चर्चेवेळी नमूद केले.
त्यावर पोलीस आयुक्तांनी साळुंखे यांच्या विनंतीची दखल घेत त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे सांगून आपण जनस्नेही पोलीस प्रशासनावर भर देणार असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.