बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांच्या उपस्थितीत खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या विभागांद्वारे राबवल्या जात असलेल्या विकास कामांच्या अंमलबजावणीबाबत आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (NHAI), नैऋत्य रेल्वे विभाग आणि विमानतळ विभाग यांनी हाती घेतलेल्या विविध विकास कामांच्या प्रगतीबाबत माहिती घेण्यात आली.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (NHAI):
बेळगाव शहरातील रिंग रोड/बायपास बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. हलगा ते झाडशाहापूर दरम्यान चालू असलेल्या रस्ता बांधकामासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेबाबत खासदारांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि या मार्गावरील सर्व जमीन अधिग्रहण कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याशिवाय हलगा ते मच्छे दरम्यानच्या 9 किमी लांबीच्या रस्ता बांधकामाचे काम नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
बेळगाव (शेगुणमट्टी) ते हुनगुंद ते रायचूर मार्गावरील बेळगाव लोकसभा मतदारसंघातील 43 किमी लांबीच्या रस्ता बांधकामासाठी पूर्वअट म्हणून आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेबाबत माहिती घेण्यात आली. शक्य तितक्या लवकर जमीन अधिग्रहण पूर्ण करून बांधकाम सुरू करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.

बैठकीत बेळगाव शहरातील हॉटेल संकम मार्गावरील फ्लायओव्हर बांधकामाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. कोणतेही बांधकाम सुरू झाल्यानंतर ते निरंतर चालू राहून पूर्ण होईपर्यंत लक्ष ठेवण्याचे आणि सार्वजनिकांना सोयीस्कर राहील अशी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले.
बेळगाव-कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे मार्ग बांधकाम:
या नवीन रेल्वे मार्गासाठी सध्या सुमारे 1200 एकर जमीन अधिग्रहण आवश्यक आहे. यासंबंधी बैठकीत जमीन अधिग्रहण प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. जमीन देणाऱ्या भूधारकांना सरकारकडून मिळणाऱ्या मोबदल्याची रक्कम शक्य तितक्या लवकर वितरित करण्याच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी सरकारच्या महसूल विभागाचे प्रमुख सचिव आणि पायाभूत सुविधा विभागाचे प्रमुख सचिव यांच्याशी संपर्क करून यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले.
या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे योजना संचालक भुवनेश कुमार, बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराजन, जमीन अधिग्रहण अधिकारी चौहान, श्रीमती राजश्री जैनापूर, नैऋत्य रेल्वे विभागाचे अभियंता निसामुद्दीन तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.