बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळा तोंडावर आल्यानंतर बेळगाव महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना नाला सफाईचे वेध लागले आहेत. त्यामुळे आता शहर आणि परिसरात नाला सफाईची मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या या मोहिमेमुळे पुन्हा एकदा वराती मागून घोडे नाचविण्याचा प्रकार सामोरा आला आहेअसा आरोप होऊ लागला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगावातील रस्ते, गटारी, पथदीप यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात यातील कितपत कामे योग्य वैज्ञानिक पद्धतीने झाली आहेत? याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा. स्मार्टसिटी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा पाहता येरे माझ्या मागल्या, अशी अवस्था आहे. आता पावसाळ्यापूर्वी सुरू होत असलेली गटार -नाले स्वच्छता मोहिमेचे काम त्यापैकीच एक आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे दरवर्षी गटारी -नाले स्वच्छतेचे महानगरपालिकेचे प्रयोग जोराच्या पावसात अयशस्वी होताना दिसतात.
हीच परिस्थिती यावर्षीही पहावयास मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यात नाले -गटारी स्वच्छतेची मोहीम पूर्ण होणे गरजेचे असते. मात्र इकडे अवकाळी पावसाला सुरुवात होते आणि महानगरपालिकेला शहाणपण सुचते अशीच अवस्था सध्या निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या या कारभाराबद्दल वारंवार तक्रारी करण्यात येतात. मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात महानगरपालिका धन्यता मानते.

सध्या महानगरपालिकेच्या गटार स्वच्छता मोहिमेबद्दल अनेक शंका कुशंका व्यक्त होत आहेत. दरम्यान ही मोहीम मार्च अखेरपर्यंत पूर्ण झाली असती तर शहरवासीयांना दिलासा मिळाला असता. मात्र पावसाळ्यात ही मोहीम करणे म्हणजे वराती मागून घोडे नाचवण्याचाच प्रकार आहे.
सध्या पावसाला काही अंशी सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिल्याच पावसात अनेक नाल्यातील गाळ रस्त्यावर येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही अवस्था नित्याची झाली असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. कांही वेळा जोराचा पाऊस आला तर अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरून त्यांचे जीवनावश्यक साहित्याचे होणारे नुकसान व होणारा मानसिक त्रास ही नित्याची बाब बनली आहे.
याची महानगरपालिकेने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. एकंदर महानगरपालिकेच्या व स्मार्ट सिटीच्या कारभाराचा फटका बेळगाव शहरवासीयांना वारंवार बसत आहे.