बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्कालीन परिस्थितीत व्यवस्थापन करण्याच्या तयारीसाठी शुक्रवारी ऑटोनगरमधील हिंडाल्को कारखान्यात मॉक ड्रिलचे आयोजन केले होते.
कारखान्यांमध्ये बायोमास बॉयलरला आग लागल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे आणि संभाव्य नुकसान कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हे तातडीचे आणि प्रभावी मॉक ड्रिल आयोजित केले होते. बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ, अग्निशमन दलाचे अधीक्षक शशिधर नीलगार आणि जिल्हा कारखाना उपसंचालक व्यंकटेश राठोड यांच्या उपस्थितीत हे मॉक ड्रिल पार पडले.
यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मॉक ड्रिल मध्ये, अपघाताची माहिती मिळताच, संबंधित सर्व विभागांच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही केली. या मॉक ड्रिलमध्ये, उच्च गॅस दाबामुळे बायोमास बॉयलरमध्ये आग लागून अपघात झाल्याचे दृश्य साकारण्यात आले. यात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर २४ कामगार जखमी झाले.

जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सुरक्षित स्थळी हलवून तात्काळ वैद्यकीय मदत केंद्रांवर प्रथमोपचार देण्यात आले. याव्यतिरिक्त, गंभीर जखमी १० कामगारांना आणि किरकोळ जखमी ५ कामगारांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
एसडीआरएफचे उपसमादेशक शरणबसव, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ निंगनगौड चनबसनगौडार यांनी मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला. हिंडाल्को कारखान्यातील ८ कर्मचारी, अग्निशमन दलाचे ११ जवान, १६ होमगार्ड आणि २० वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या मॉक ड्रिलमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.





