बेळगाव लाईव्ह : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांच्या ‘कन्नड भाषेचा उगम तामिळमधून झाला’ या वक्तव्यावरून कर्नाटकात संतापाची लाट उसळली आहे. बेळगावी येथे कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज आयनॉक्स चित्रपटगृहाबाहेर जोरदार निदर्शने करत कमल हासन यांच्या प्रतिमेचे दहन केले. या वादग्रस्त विधानामुळे कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये भाषिक संघर्षाला पुन्हा तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
कमल हासन यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात कन्नड भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कन्नड भाषिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘कन्नड भाषा ही तामिळमधून जन्माला आली’ असे त्यांचे विधान होते. या विधानावर कर्नाटक रक्षण वेदिकेने तीव्र आक्षेप घेतला आहे. बेळगावीतील आंदोलनादरम्यान, संघटनेचे दीपक गुडगनट्टी यांनी माध्यमांशी बोलताना कमल हासन यांच्यावर सडकून टीका केली.
“कमल हासन यांना कन्नड भाषेचा इतिहास कदाचित माहीत नसेल. केवळ प्रसिद्धीसाठी आणि तामिळनाडूमध्ये स्टार प्रचारक बनण्यासाठी त्यांनी हे मूर्खपणाचे विधान केले आहे. कन्नड जनता हे कदापि सहन करणार नाही,” असे गुडगनट्टी म्हणाले.

गुडगनट्टी यांनी कमल हासन यांना तात्काळ कन्नड लोकांची माफी मागण्याची मागणी केली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर कर्नाटक राज्यात कमल हासन यांचे कोणतेही चित्रपट आणि इतर कोणत्याही तामिळ चित्रपटांना प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनात कर्नाटक रक्षण वेदिकेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कमल हासन यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांतील भाषिक आणि सांस्कृतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अनेकवेळा भाषा आणि सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे कमल हासन यांच्या या विधानाचे पडसाद आता कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.