बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील चिंचवाड (ता. खानापूर) गावचा सुपुत्र आणि कर्नाटक सरकारच्या युवा सक्षमीकरण व क्रीडा खात्याचा भालाफेकपटू शशांक गंगाधर पाटील याने येत्या जुलै महिन्यात जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक पातळीवरील विश्व विद्यापीठ स्पर्धेसाठीचा पात्रता दर्जा गाठून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सदर प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तो फक्त बेळगावातीलच नव्हे तर संपूर्ण कर्नाटकातील पहिला आणि भारतातील तिसरा क्रीडापटू आहे. या पद्धतीने शेतकरी कुटुंबातील शशांक आता राष्ट्रीय स्तरावर आपले व आपल्या गावाचे नांव उज्वल करू लागला आहे.
उडीसा -भुवनेश्वर येथील केआयआयटी विद्यापीठ येथे नुकत्याच पार पडलेल्या विश्व विद्यापीठ स्पर्धेच्या निवड चांचणीत बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचा भालाफेकपटू शशांक पाटील याने आपल्या तिसऱ्या फेकीत 80.23 मी. इतक्या लांब भाला फेकून प्रथम स्थान प्राप्त करण्याबरोबरच नवा स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला आहे. निवड चांचणीत शशांक मागोमाग पंजाब विद्यापीठाचा सागर (78.86 मी.), सीसीएस युनिव्हर्सिटी मिरचा दिपेक्षु शर्मा (77.85 मी.), केआयआयटीटी भुनेश्वर विद्यापीठाचा साहिल शीलवाल आणि राज ऋषी भारती विद्यापीठाचा विपुल यादव यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळविला.
या पद्धतीने अव्वल स्थान प्राप्त करत शशांक पाटील हा जर्मनी येथे येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या विश्व विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. शशांक याने यापूर्वी दसरा क्रीडा महोत्सवामध्ये 74.74 मी. लांब झाला फेकून नवा स्पर्धा विक्रम नोंदवला होता. त्याचप्रमाणे कोची येथे झालेल्या राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत 76.32 मी. इतकी भालाफेक करून प्रथम क्रमांक पटकावला होता. याखेरीज मुंबई येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याने 76.76 इतकी भालाफेक करून वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविली होती. त्यानंतर आता विश्व विद्यापीठ निवड चांचणी 80.23 मीटर भालाफेक करून त्याने आपण आपल्या कामगिरी अधिकाधिक प्रगती करत आहोत हे दाखवून दिले आहे.
खानापूर तालुक्यातील चिंचवाड गावातील शेतकरी गंगाधर पाटील व अंजली पाटील यांचा चिरंजीव असलेल्या शशांक याला लहानपणापासूनच खेळाची आवड आहे. त्याचे इयत्ता दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण अळणावर येथील सेंट तेरेसा हायस्कूलमध्ये झाले असून सध्या तो राणी चन्नम्मा विद्यापीठाशी संलग्न लिंगराज महाविद्यालयामध्ये कला शाखेच्या पदवी पूर्व द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. खेळाची आवड असलेला शशांक शाळेत आठवीत असताना क्रीडाशिक्षक मंजुनाथ पाटील यांनी त्याला खेळांसाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने भालाफेकीचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर महाविद्यालयात पदवी पूर्व प्रथम वर्षात येताच तो बेळगावच्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलशी जोडला गेला.
या ठिकाणी त्याने ॲथलेटिक प्रशिक्षक संजीवकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व कठोर मेहनत घेत भालाफेक क्रीडा प्रकारात आपली कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच दोन वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या निधनाचे दुःख त्याला सहन करावे लागले. मात्र पितृशोक असतानाही त्याने भालाफेकीतील आपले लक्ष विचलित होऊ न देता सातत्याने आपली कामगिरी उंचावली. यासाठी त्याला ॲथलेटिक्स प्रशिक्षक संजीवकुमार नाईक, बसवराज बिसन्नावर, ए. बी. शिंत्रे व हर्षवर्धन शिंगाडे यांचे मार्गदर्शन, तसेच खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि युवा सक्षमीकरण व क्रीडा खात्याचे बेळगाव जिल्हा उपसंचालक बी. श्रीनिवास यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
जर्मनीत जुलै महिन्यात होणाऱ्या विश्व विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरल्यामुळे त्यादरम्यान एखादे विशेष सराव शिबिर होण्याची शक्यता असली तरी मी डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगाव येथे माझा कसून सराव सुरू ठेवणार आहे. भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा यांचा आदर्श घेऊन भविष्यात मला या क्रीडा प्रकारात नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करावयाचे आहेत. त्याचप्रमाणे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह ऑलम्पिकमध्ये अभिमानाने भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे नांव उंचवावयाचे आहे, असे शशांक पाटील याने बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.