बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेतील कांदा मार्केट येथे महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली असली तरी आता पुन्हा व्यापारी व विक्रेत्यांकडून तेथे अतिक्रमण केले जात असल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगाव महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून गेल्या आठवडाभरापासून शहरातील कंबळी खूट, गणपत गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली आणि कांदा मार्केट या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांच्या हातगाड्या हटवण्याबरोबरच व्यापारी आस्थापना समोरील जंप्स, नो -पार्किंगचे ठोकळे आणि फलक हटविण्यात आले. गेल्या आठवड्यात कांदा मार्केट येथे सदर कारवाई अंतर्गत व्यापारी व विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला होता.

मात्र आता पुन्हा त्या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण सुरू झाले आहे. या पद्धतीने किरकोळ विक्रेत्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण केले जात असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
तरी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही या दृष्टीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या ग्राहक आणि दुचाकी वाहन चालकांकडून केली जात आहे.