बेळगाव लाईव्ह :ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील यांच्या पुढाकाराने व कांही सदस्यांच्या अधिपत्याखाली कडोली ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठी विहीर निर्माण करण्यात येत आहे. युद्धपातळीवर सुरू असलेले विहीर निर्मितीचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच ही विहीर ग्रामस्थांच्या सेवेत रुजू होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
मागील काही दिवसांपासून कडोली गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याची दखल घेत ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्यांचे उपायोजनेसाठी प्रयत्न सुरू होते. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध मार्ग अवलंबले जात होते.
दरम्यान ग्रामपंचायत अध्यक्षांनी याबाबत वारंवार अधिकाऱ्यांना सूचना करत कोणत्याही परिस्थितीत पाणी समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. त्याचेच फलित म्हणून आता कडोली येथे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या विहिरीचे बांधकाम करण्यात येत आहे.
या विहिरीचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच हे काम संपेल अशी माहिती ग्रामपंचायत अध्यक्ष सागर मोहन पाटील यांनी दिली आहे. इतर ठिकाणीही पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी अध्यक्ष पाटील कार्यशील असून गावातील इतर विकास कामांनाही प्राधान्य देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

यापूर्वीही ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य नागेश बांदिवडेकर, प्रभा पाटील, संगीता चिंचनगी यास इतर सदस्यांनी आपल्या प्रभागातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी धडपड केली आहे. आता कडोली गावातील पाण्याची समस्या मिटवण्यासाठी या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कडोली ग्रामपंचायत हद्दीत आता कूपनलिका आणि विहिरी खोदायचे काम हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली तर गावातील बऱ्याच तक्रारी कमी होतील, या धारणेने युद्धपातळीवर एका विहिरीचे काम हाती घेण्यात आले आहे आणि ते काम आता पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे कडोली ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


