बेळगाव लाईव्ह :पहेलगाम येथील अतिरेकी हरल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याच्याशी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे असे सांगून तसे आवाहन बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मंगळवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण, भारतीय रेल्वे आणि भारतीय हवाई दलासह अन्य संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार शेट्टर प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भारत युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मात्र एका दिवसात तयारी करून कुस्ती जिंकता येत नाही, त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करावी लागते. गेल्या आठवड्याभरापासून आपण पाहतो आहोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उच्चस्तरीय बैठकांसह संरक्षण दल प्रमुखांच्या बैठका होत आहेत. युद्धाच्या योजना आखल्या जात आहेत.
तथापी युद्धाची घोषणा झाल्यानंतर निर्माण होणारी परिस्थितीत, जनतेची सुरक्षा वगैरे गोष्टी हाताळण्यासाठी पूर्वतयारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याच्याशी आपण सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे. मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवावा अशी समस्त देशवासीयांची मागणी आहे आणि त्याचीच तयारी केली जात असून मोदीजी योग्य वेळी पाकिस्तानला चांगला धडा शिकवतील. मात्र तत्पूर्वी पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व राज्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नागरिकांना तयार केले जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानशी फक्त युद्ध करून चालणार नाही, तर सिंधू नदीचे पाणी जे भारताने अडवले आहे त्यामुळे विपरीत परिणाम होणार नाही याचीही दक्षता घेतली गेली पाहिजे.
त्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू झाली असून सिंधू नदीच्या वळविण्यात आलेल्या पात्राच्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान जाणार आहेत. एकंदर पंतप्रधान मोदी यांनी लष्करी युद्ध आणि नागरी युद्ध अशी दोन्ही युद्ध जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. भारताच्या हद्दीतून जाणारे पाकिस्तानचे हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. समुद्र मार्गे पाकिस्तानी व्यापारी व प्रवासी जहाजांना भारताच्या हद्दीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
त्यांच्यासाठी भारताची बंदरे बंद करण्यात आली आहेत. या सर्व गोष्टींमुळे पाकिस्तानवर मोठा विपरीत परिणाम होऊ लागला असून भारताच्या दृष्टीने चांगले निकाल लागत आहेत, असे खासदार शेट्टर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्या बाबतीत कर्नाटक सरकारच्या भूमिकेबद्दल बोलताना केंद्र सरकारने सूचना केल्यानंतर त्याचे पालन करणे प्रत्येक राज्य सरकारचे कर्तव्य असते. त्या सूचनेचे योग्य पद्धतीने प्रामाणिकपणे काटेकोर पालन केले गेले पाहिजे. राज्यात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना हेरण्यासाठी योग्य रीतीने सर्वेक्षण आणि ओळख पडताळणी केली गेली पाहिजे.
तथापि कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून केंद्राच्या सूचनेचे काटेकोर पालन केले जात नसल्याचे दिसून येते. आज देखील आपल्या राज्यातील बऱ्याच भागात पाकिस्तानी व्हिसा असलेल्यांसह त्या व्हिसाची मुदत संपून गेलेले अनेक पाकिस्तानी नागरिक मुक्काम ठोकून आहेत. म्हणूनच त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ माघारी पाकिस्तानमध्ये पाठवून द्यावे, अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती शेवटी खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.