बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड गावामध्ये काही दिवसांपूर्वी एका बांधकाम सुरू असलेल्या मशिदीतील पवित्र धार्मिक ग्रंथ अज्ञात समाजकंटकांनी जाळल्याच्या गंभीर घटनेनंतर परिसरात पसरलेला तणाव आता बेळगाव शहरापर्यंत पोहोचला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज बेळगाव शहरात हजारो मुस्लिम बांधवांनी विराट मोर्चा काढला. आमदार असिफ सेठ यांच्या मध्यस्थीनंतर आणि पोलिसांच्या आश्वासनानंतर सध्या हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
संतिबस्तवाड गावातील मशिदीच्या तळमजल्यावर ठेवण्यात आलेले पवित्र धार्मिक ग्रंथ पहाटेच्या वेळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले होते. या अक्षम्य कृत्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप आणि आक्रोश पसरला होता. घटनेनंतर ग्रामस्थ आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. याचदरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बान्यांग, डीसीपी रोहन जगदीश यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले आणि या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित आरोपींना येत्या तीन दिवसांत अटक केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, पोलिसांच्या आश्वासनानंतरही तपासाच्या गतीबाबत मुस्लिम युवकांमध्ये नाराजी कायम होती.

या निषेधार्थ आणि आरोपींच्या तात्काळ अटकेच्या मागणीसाठी संतिबस्तवाड येथून हजारो मुस्लिम बांधवांनी मोर्चाने बेळगाव शहराकडे कूच केले. शहरातील प्रमुख चन्नम्मा चौकात हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले आणि त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत जोरदार निदर्शने केली.
चन्नम्मा चौकात जमलेल्या जमावाने पवित्र धार्मिक ग्रंथ जाळण्याच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत, या घृणास्पद कृत्यामागे असलेल्या आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली.
यावेळी बेळगाव शहर पोलीस आयुक्त मार्टिन, उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित होते आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. या आंदोलनस्थळी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनीही हजेरी लावली आणि जमावाला संबोधित केले. त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा करून आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आमदार असिफ सेठ यांच्या आश्वासनानंतर, मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी आणि युवकांनी सध्याचे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.
पोलीस प्रशासन या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे. मशिदीतील सीसीटीव्ही कॅमेरे काही दिवसांपूर्वी दुरुस्तीसाठी काढले होते, ही बाब तपासात महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि गस्त सुरू आहे. संतिबस्तवाड येथील पवित्र धार्मिक ग्रंथ जाळण्याच्या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव आणि त्यानंतर बेळगाव शहरात झालेला मोठा मोर्चा यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती.
आमदार आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर सध्या आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असले तरी, पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुढील तीन दिवसांत आरोपींना अटक होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त कायम आहे.