बेळगाव लाईव्ह : शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात उत्तम संतुलन साधत सान्वी पाटील या विद्यार्थिनीने ‘संत मीरा इंग्रजी माध्यमिक शाळे’चे नाव उज्ज्वल केले आहे. 2025 मधील दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 619 गुण मिळवून तिने केवळ शाळेतच नव्हे तर बेळगाव शहरातही प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अनगोळ, बेळगाव येथील संत मीरा इंग्रजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी सान्वी संतोष पाटील ही राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू असून, शालेय शिक्षणातही तिने अपूर्व यश मिळवले आहे. 99.4 टक्के गुणांची कमाई करत तिने दाखवून दिले की खेळाबरोबर अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा असतो.
सान्वी पाटीलने झारखंड (रांची) व जम्मू कश्मीर येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत आयोजित राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये विद्याभारतीचे प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या अष्टपैलूतेचं हे एक आदर्श उदाहरण ठरलं आहे.
तिच्या पाठोपाठ विद्या कैलास पिटुले हिने 625 पैकी 613 गुण (98.08%), सृष्टी यल्लाप्पा वाघ हिने 608 गुण (97.28%), अलिना परवेजखान पठाण हिने 606 गुण (96.96%) आणि अमित नारायण मिरजकर याने 605 गुण (96.8%) मिळवत अनुक्रमे दुसरा ते पाचवा क्रमांक मिळवला.

या यशस्वी विद्यार्थ्यांमुळे संत मीरा इंग्रजी माध्यमिक शाळेचा निकाल अत्यंत उज्वल झाला आहे. यावर्षी शाळेतील 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
सान्वी पाटील हिच्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव आणि विविध विषयांचे शिक्षक यांनी तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालक व शिक्षक वर्गानेही तिच्या मेहनतीचं भरभरून कौतुक केलं आहे.