बेळगाव लाईव्ह :वाढदिवसाच्या निमित्ताने पैसे खर्च करून मौजमजा करण्याला फाटा देत तेच पैसे आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या होतकरू गुणी विद्यार्थ्याला आर्थिक मदतीच्या स्वरूपात देत आपला वाढदिवस साजरा करण्याचा आदर्शवत उपक्रम माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी नुकताच राबवला.
अनगोळ येथील अमित नारायण मिरजकर हा विद्यार्थी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत 98.98 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. गरीब कुटुंबातून वर आलेल्या अमित याची घरची परिस्थिती हलाखीची आहे.
भाड्याच्या घरात राहणाऱ्या मिरजकर कुटुंबीयांना स्वतःच घर देखील नाही, अशा अशा परिस्थितीवर मात करत जीवनातील महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेत अमित मिरजकर यांनी संपादन केलेले स्पृहणीय यश लक्षात घेऊन माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी त्याला मदतीचा हात पुढे केला आहे. अमित मधील गुणवत्ता हेरून गुंजटकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त त्याला पुढील शिक्षणासाठी म्हणून 20,000 रुपयाची भरघोस मदत देऊ केली आहे.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत अमित मिरजकर याने इंग्रजी (119 गुण), कन्नड (100 गुण), हिंदी (97 गुण), गणित (100 गुण), विज्ञान (92 गुण) आणि समाजविज्ञान (97 गुण) या सर्व विषयांमध्ये ‘ए प्लस’ श्रेणी प्राप्त केली आहे. आर्थिक परिस्थितीची बेताची असताना कोणत्याही मोठ्या पाठबळ शिवाय 98 टक्के गुण मिळवल्याबद्दल अमितचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मात्र माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी सामाजिक भान राखत अमित याच्या उज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी आर्थिक मदत दिल्याने त्यांची देखील प्रशंसा होत आहे.
अशा होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देत प्रोत्साहन देण्यातच काम गुंजटकर यांनी केले आहे अशी मदत समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.