बेळगाव लाईव्ह : कुमारी संयुक्ता अविनाश भातकांडे या विद्यार्थीनीने 2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत 95.52% गुण घेऊन दैदिप्यमान यश मिळविले असून वनिता विद्यालयात ती मराठी माध्यमात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. 2 मे रोजी हा निकाल आला पण परिस्थितीमुळे हे यश गेले महिनाभर झाकोळले गेले होते.
संयुक्ताने हे यश आपल्या मातृभाषा मराठीतून तर मिळविलेच पण ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळविले आहे विशेष. संयुक्ताचे कुटुंब मूळचे बेळगाव येथील भातकांडे गल्लीचे असून तिथे त्यांचे सामायिक घर आहे, पण त्याची दोनवर्षांपूर्वी पडझड झाली , नाईलाजास्तव भातकांडे कुटुंबियांना गल्लीतून बाहेर येऊन भाड्याच्या घरात राहण्याचा विचार करत असताना वडिलांच्या एका मित्राने त्यांना आपल्या मंगल कार्यालयातील खोलीत जागा दिली.
संयुक्ताचे वडील अविनाश हे चन्नम्मा नगर येथे लेथ मशीनवर व आई प्रभावती शिनोळी येथील काजू फॅक्टरीत रोजंदारीवर जाते, वयोवृद्द आजी ही सुनेने आणलेल्या काजू सोलून पुन्हा त्या फॅक्टरीला पाठविल्या जातात तर लहान भाऊ सर्वेश हा इयत्ता आठवीत आहे.
आशा प्रतिकूल परिस्थितीत संयुक्ताने मिळविलेले यश हे कौतुकास्पद असून तिने अकरावीसाठी जीएसस कॉलेज विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असून तिला शैक्षणिक भविष्यासाठी थोडी फार आर्थिक मदत व्हावी यासाठी तिच्या सन्माना बरोबरच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते .आर एम.चौगुले, मदन बामणे यांनी दहा हजाराचा धनादेश सुपूर्द केला तर सामाजिक कार्यकर्ते व सर्वदा सोसायटीचे माजी संचालक गणेश काकतकर, सदाशिव नगर येथील त्यांच्या भगिनी सौ.माधुरी अनिल माळी व मित्रपरीवार यांच्या कडून कुमारी संयुक्ता हिला रोख दहा हजाराची मदत करण्यात आली व श्रीमती गीता मनोहर काकतकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी युवा समिती सीमाभाग चे कार्याध्यक्ष, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील,हर्षित मोदानी,दुर्वांक पाटील,सर्वेश भातकांडे व इतर उपस्थित होते.