बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, लवकरच शहराचा कायापालट होणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज बेळगाव पत्रकार संघाच्या संवाद कार्यक्रमात बोलताना विकासाचा विस्तृत ‘रोडमॅप’ सादर केला. सवदत्ती येथील प्रसिद्ध श्री रेणुका यल्लम्मा मंदिराचा विकास, रिंगरोड, तसेच खानापूरमधील वनवासी लोकांचे पुनर्वसन आणि बळ्ळारी नाल्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.
उत्तर कर्नाटकातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा मंदिराचा विकास हा जिल्हा प्रशासनाचा एक महत्त्वाचा अजेंडा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, पर्यटन विभाग आणि श्री रेणुका यल्लम्मा मंदिर प्राधिकरणाच्या सहकार्याने हा विकास प्रकल्प हाती घेतला जाईल.
मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व जपूनच भाविकांना आधुनिक सुविधा पुरवल्या जातील. यामध्ये देवीच्या सुलभ दर्शनासाठी उत्तम व्यवस्था, भाविकांना मूलभूत सोयीसुविधा, प्रशस्त पार्किंग, दारू आणि गुटख्यावर पूर्णपणे बंदी, स्वच्छ आणि खुले स्वयंपाकघर, भक्त निवास, मंदिराला त्याचे मूळ स्वरूप देणे, तिरुपती मंदिराच्या धर्तीवर रांगांसाठी काउंटर, मोठे हॉल आणि दासोह भवन यांचा समावेश असेल.
तसेच, ऑनलाइन देणगी व्यवस्था कार्यान्वित केली जाईल आणि स्थानिक व्यापार व परंपरांना कोणताही धक्का न लावता विकासकामे हाती घेतली जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी एक महत्वपूर्ण विधान करत मी वेगळ्या धर्माचा असलो तरी, शक्तीदेवता रेणुका यल्लम्मा क्षेत्राच्या विकासाची संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे सांगितले.

खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य, चापगाव, तळेवाडी आणि आमगाव यांसारख्या वनक्षेत्रात राहणाऱ्या वनवासी लोकांच्या पुनर्वसनाबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. जे वनवासी लोक स्वेच्छेने मानवी वस्तीत येण्यास तयार असतील, त्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, या वनवासी लोकांना शिक्षण आणि आरोग्याच्या उत्तम सुविधा पुरवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बेळगाव शहरातील जुनी आणि गंभीर समस्या असलेल्या बळ्ळारी नाल्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. नाल्याच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी बोगदा बांधकाम आणि ओव्हरफ्लोसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती महामार्ग प्राधिकरणाला करण्यात आली आहे. जर स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले, तर पुढील डिसेंबरपर्यंत या नाल्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येतील, अशी खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
बेळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रिंगरोड बांधकाम अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या डिसेंबरपर्यंत बायपास रस्त्याचे बांधकाम पूर्ण होईल. या रस्त्यामुळे धारवाडकडून येणाऱ्या वाहनचालकांना बेळगाव शहरात न येता थेट गोव्याला किंवा कोल्हापूरला जाता येईल, ज्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पणजी रस्त्याला जोडला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
याशिवाय, बेळगाव शहरातील तानाजी गल्लीतील रस्त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर या रस्त्याची आता आवश्यकता नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वे मंडळाला पत्र लिहून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण संवाद कार्यक्रमात पत्रकार संघाचे प्रमुख विलास जोशी यांच्यासह बेळगाव शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते.