बेळगाव लाईव्ह : अंगणवाडीच्या शिक्षिकांचे नाव घेत रेशन कार्ड वरील माहिती सांगून महिलांना फोन करून त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती उकळून फसवणुकीचे प्रकार सुरू असून, खात्यातून थेट पैसे गायब होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. खादरवाडी येथील एका महिलेची अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे.
८७७०३४०४०४ या क्रमांकावरून महिलांना कॉल येत असून, “आम्ही अंगणवाडीतून बोलतोय, तुमच्या मुलांचे अंगणवाडीचे पैसे जमा झाले आहेत, मेसेज आला असेल तो रिसीव्ह करा,” असे सांगून त्यांना भूल पाडले जात आहे. महिलांकडून फोनवर रेशन कार्डावरील तपशील सांगून पाठवलेल्या लिंकवरील मेसेज स्वीकारल्यानंतर त्यांचे बँक खात्यातून २००० रुपये तात्काळ वजा होत असल्याची माहिती समोर आली आहे.
या फसवणुकीसाठी कॉल करणारे व्यक्ती अंगणवाडी शिक्षिकांनीच नंबर दिला आहे, अशी बतावणी करून विश्वास संपादन करत आहेत. सध्या अनेक महिलांना अशा स्वरूपाचे कॉल येत असल्याने हा प्रकार गंभीर बनला आहे. सायबर गुन्हे शाखेने अशा कॉल्सबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महिलांनी कोणतीही वैयक्तिक माहिती, ओटीपी किंवा बँक तपशील फोनवरून सांगू नये, तसेच कोणत्याही अनोळखी लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नये, अशी सूचना देण्यात येत आहे. सायबर फसवणूक रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे गरजेचे आहे.