बेळगाव लाईव्ह : बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून आयपीएस अधिकारी भूषण गुलाबराव बोरसे यांनी आज पदभार स्वीकारला. शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे, रस्ता सुरक्षा, सायबर क्राईम, महिला आणि मुलांची सुरक्षा सुनिश्चित करणे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही आपली मुख्य उद्दिष्टे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी बेळगावचे शहर पोलीस आयुक्त असलेले याडा मार्टिन मार्बन्यांग यांची अचानक बदली झाल्याने रिक्त झालेल्या या जागेवर भूषण गुलाबराव बोरसे यांची वर्णी लागली आहे. गुरुवारी सायंकाळी राज्य सरकारने राज्यातील पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये बेळगाव पोलीस आयुक्तांचाही समावेश होता.
भूषण गुलाबराव बोरसे हे २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांना पोलीस विभागात १६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी ते सायबर क्राईम आणि नार्कोटिक्स विभागात सेवा बजावत होते. अनेक वर्षांनंतर बेळगावच्या शहर पोलीस विभागात मराठी अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त होत आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर बोरसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “बेळगावचे वातावरण अतिशय उत्तम आहे, आणि वातावरणापेक्षा बेळगावचे लोक छान आहेत.” जनतेच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची ग्वाही त्यांनी दिली. आपल्या सहकाऱ्यांसमवेत समन्वय राखून उत्तम कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नूतन पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारताना पोलीस विभागाच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी डीसीपी रोहन जगदीश यांच्यासह पोलीस विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून नूतन पोलीस आयुक्तांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.




