बेळगाव लाईव्ह: मागील चार दिवसापासून बेळगाव शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कांही ठिकाणी ढगफुटी सदृश परिस्थिती तर काही ठिकाणी हातां तोंडाला आलेला भाजीपाला वाया गेल्याचे प्रकार सध्या पहावयास मिळत आहे. मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कधी अवकाळी तर कधी मान्सून असे चित्र पहावयास मिळत असले तरी पाऊस सध्या चांगला झोडपत आहे.
बेळगाव तालुक्याला पुन्हा एकदा आज मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पावसाने चांगले झोडपल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. कांही ठिकाणचे पत्रे उडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेळगाव तालुक्यातील अनेक गावात अवकाळी सदृश पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटीचा प्रत्यय आला आहे.
काही ठिकाणी हा पाऊस इतका झाला की घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. संकेश्वर नजीकच्या भागातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास पुन्हा पुराचा धोका नाकारता येत नाही.
दरम्यान मार्कंडेय नदी पुन्हा एकदा भरून वाहत असून केवळ अवकाळी पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली तर मान्सून काळात काय अवस्था होणार अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. कांही ठिकाणी हाता तोंडाला आलेला भाजीपाला या पावसामुळे वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान या अवकाळी पावसामुळे अनेकांना फटका बसला असून काही ठिकाणी मशागतीच्या कामांना पोषक वातावरण निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान हा पाऊस असाच बरसला तर अनेक ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्याच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नदी, नाले प्रवाहित झाले आहेत, तर काही ठिकाणी हा पाऊस मारक ठरत असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.