बेळगाव लाईव्ह : एकेकाळी शेतीने समृद्ध आणि निसर्गरम्य म्हणून ओळखले जाणारे बेळगाव शहर सध्या भूमाफियांच्या मगरमिठीत सापडले आहे. राजकीय स्वार्थापोटी आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून येथील सुपीक जमिनींवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरु असून, यामुळे शेतकरी आणि नागरिक प्रचंड संतापले आहेत. विशेषतः बेळगाव शहरी विकास प्राधिकरण (बुडा) या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, त्यांच्या कामकाजातील भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन असह्य झाले आहे.
शहरा सभोतालची गावे बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट करणे असो किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून सुपीक आणि मालकी जमिनी संपादन करण्याचा घाट घालणे असो या सगळ्या प्रकारावर शेतकरी संतप्त झाले आहेत.बेळगावच्या चोहोबाजूने असलेल्या सुपीक जमिनी येथील शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या आहेत. अनेक पिढ्यांपासून शेती करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या या शेतकऱ्यांच्या जमिनींवर भूमाफियांचा डोळा पडला आहे. सुरुवातीला राजकीय स्वार्थापोटी भूसंपादनाच्या नावाखाली जमिनी बळकावण्याचा प्रयत्न झाला. याचा बेळगाव शेतकरी संघटनेने तीव्र विरोध करून तो यशस्वीपणे हाणून पाडला. मात्र, आता बुडा आणि इतर काही माध्यमांतून भूमाफिया संगनमताने नव्या योजना राबवून जमिनी हडपण्याचा कुटील डाव आखत आहेत.
सध्या नानावाडी परिसरातील ३० ते ४० एकर मालकी जमिनी बुडाच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चा आहेत. बुडाच्या माध्यमातून या जमिनींवर ‘वरवंटा’ फिरवण्याचा डाव आखला जात आहे अशा सर्व संपादन विरोधात शेतकरी शांत बसणार नाहीत, असा इशारा शेतकरी नेते नारायण सावंत यांनी दिला आहे.

कुळकायद्याने शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेल्या जमिनींमध्येही भूमाफियांनी शिरकाव केल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. जमिनींच्या नोंदींमध्ये फेरफार करण्याचे, रेकॉर्ड अदलाबदल करण्याचे कारस्थान सुरु आहे. हा शेतकऱ्यांच्या मालकी हक्कावरचा थेट हल्ला असून, शेतकरी संघटनांनी हा डाव हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे. बेळगावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी तयारी असल्याचे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही समस्या उद्भवल्यास तात्काळ शेतकरी संघटनेकडे संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बेळगावमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी बुडाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, सध्या हे प्राधिकरण भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. ‘लँड यूज’ बदलणे, ‘एनओसी मिळवणे, आणि ‘लँड ॲक्विझिशन’ अशा अनेक कामांसाठी नागरिकांना बुडा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. या कामांसाठी आकारण्यात येणारे शुल्क दुप्पट, तिप्पट नव्हे तर चौपट आकारले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नागरिकांची अक्षरशः लूट सुरु असून, यामुळे बुडाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बुडाचे भूसंपादन यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त ठरले आहे. आताही विविध कामकाजासाठी बुडाच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता होत असल्याचा आरोप आहे. पारदर्शकतेचा अभाव आणि वाढत्या भ्रष्टाचाराने बुडा पूर्णपणे पोखरले आहे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
बेळगावमधील शेतकरी आणि नागरिक या भूमाफियांच्या आणि बुडाच्या मनमानी कारभाराला कंटाळले आहेत. सुपीक जमिनींवर होत असलेला हा अन्याय आणि बुडामधील वाढता भ्रष्टाचार यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. जर या परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना केली नाही, तर बेळगावात मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.