बेळगाव लाईव्ह :आज एसएसएलसी परीक्षेचा निकाल जाहीर होताच बेळगाव शहर व तालुक्यात प्रथम क्रमांक आणि बेळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलच्या निधी नंदकुमार कंग्राळकर हिच्या अनगोळ येथील घरी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या आनंदोत्सवात सामील होत बेळगाव लाईव्हने निधी कंग्राळकर तिची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यावेळी परीक्षेतील यशाबद्दल आपल्याला खूप आनंद झाल्याचे सांगून निधीने संपूर्ण वर्षभर सतत पाठिंबा दिल्याबद्दल आपल्या आई-वडिलांचे आभार मानले.
त्यांनी माझ्यावर कोणतेही दडपण न आणता सतत प्रोत्साहित केल्यामुळे मी हे यश मिळवू शकले. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षकांनी ही वेळोवेळी अभ्यासातील शंकांचे निरसन करून आपल्याला मार्गदर्शन केल्याचे सांगून दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी आपण नियमितपणे दिवसातून सात ते आठ तास मधेमधे ब्रेक घेत अभ्यास केल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे भविष्यात आपल्याला इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावयाचे असून ते मी त्या संदर्भातील प्रवेश परीक्षांच्या निकालावर ठरवणार आहे, असे निधी म्हणाली. बेळगाव शहरासह तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या निधी कंग्राळकर हिने परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावयाचे असेल तर फक्त परीक्षा जवळ आली की अभ्यास करून उपयोग नाही तर दररोज नियमितपणे ठराविक तास अभ्यास केला पाहिजे. अभ्यासामध्ये सातत्य असेल तर यश निश्चित मिळते. अभ्यासात चढ-उतार येतात मात्र हार न मानता येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे गेले पाहिजे, असा संदेश पुढील वर्षी एसएसएलसीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.
निधीची आजी आणि आई रेश्मा नंदकुमार कंग्राळकर यांनीही आपल्या मुलीचे यश पाहून आपल्याला खूप आनंद झाल्याचे सांगितले. निधीच्या आत्याने ती लहानपणापासूनच अतिशय हुशार असल्याचे सांगून शाळेत पहिलीपासून आतापर्यंत तिने अभ्यासात पहिला क्रमांक सोडलेला नाही असे स्पष्ट केले. सरावाने माणूस परिपूर्ण होतो असे म्हणतात आणि तेच निधीने केले आहे त्यामुळेच तिला घवघवीत यश मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.