बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना हद्दपारीची नोटीस मिळाल्याने सीमाभागातील मराठी कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच समितीच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना या घटनेने अधिकच अस्वस्थ केले आहे. कर्नाटक पोलिसांचे अत्याचार सीमावासीयांसाठी नवे नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून कट्टर कार्यकर्त्यांना जुलुमी अत्याचाराखाली दडपले जात आहे. तरीही या झोटिंगशाहीला न जुमानता अनेक कार्यकर्ते निडरपणे सीमालढ्यात झुंज देत राहिले आहेत.
नवनवीन कायदे आणि त्यांच्या कडक अंमलबजावणीमुळे मराठी तरुणाईच्या भविष्यावर, करिअरवर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. हा लढा कुण्या एका व्यक्तीच्या बळावर लढला जाऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन, संघटित होऊन लढण्याची आवश्यकता आहे. शुभम शेळके यांना हद्दपारीची नोटीस मिळाल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शनपर बैठक बोलावली. या बैठकीत खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, केवळ प्रसिद्धीसाठी कोणतेही आक्रमक वक्तव्य करू नये. मोठेपणा आणि रुबाबासाठी कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नयेत. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त आणि भडक संदेश प्रसारित करू नये. संयमाने आणि मर्यादेच्या चौकटीत राहून सीमालढा पुढे न्यायला हवा. प्रत्येक मराठी भाषिकाला विश्वासात घेत आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
सीमालढा अंतिम टप्प्यावर असताना कर्नाटक सरकार आपले प्रयत्न अधिक तीव्र करत आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांची एक चुकीची कृती किंवा चुकीचे पाऊल घातक ठरू शकते. आधीच काहीजण समितीच्या प्रवाहापासून दूर गेले आहेत. त्यामुळे आता ऐन निर्णायक क्षणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. महाराष्ट्र सरकारशी समितीच्या नेत्यांचा सातत्याने संपर्क सुरू आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी सीमाभागातील परिस्थिती अधिक चिघळू नये, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने विचार करण्याची गरज आहे.
सीमालढ्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. हौतात्म्य पत्करले आहेत. अशा संघर्षमय इतिहासाला आणि या पवित्र लढ्याला क्षुल्लक कारणांमुळे काळिमा फासला जाता कामा नये. मराठी बांधवांनी आपल्या रक्ताने हा लढा तेजस्वी ठेवला आहे. त्या रक्ताचा अपमान होणार नाही, याची काळजी प्रत्येक मराठी कार्यकर्त्याने घ्यायला हवी. कर्नाटक प्रशासन सीमाभाग आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करत आहे. त्यामुळे मराठी नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कुठलीही चूक होता कामा नये, हे ध्यानात ठेवावे. कोणतेही अविचाराने उचललेले पाऊल संपूर्ण सीमालढ्यासाठी मारक ठरू शकते. अशा परिस्थितीत गनिमी काव्याची रणनीती आखून लढा अधिक बळकट करण्याची गरज आहे. संयम आणि चाणाक्षपणाने लढत राहिल्यास सीमावासीयांचे स्वप्न लवकरच साकार होईल, यात तिळमात्र शंका नाही.
आता अधिकाधिक मराठी भाषिकांना मूळ प्रवाहात आणून सीमाभागातील मराठी शक्ती अधिक दृढ करण्याची गरज आहे. कठोर कायद्यांमुळे मराठी भाषिकांवर अन्याय झाला तरी न्यायालयाच्या माध्यमातून योग्य तो न्याय मिळवता येईल. सीमालढा हा केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हे, तर मराठी अस्मितेसाठी आहे. त्यामुळे संयमाने आणि मजबूत रणनीतीने हा लढा लढावा लागेल. सीमालढ्यासाठी आपल्या हौतात्म्याने या मातीत रक्त सांडले आहे. त्या रक्ताचा आदर राखण्याची जबाबदारी आपली आहे. तरुणांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होईल असे कोणतेही पाऊल टाळावे. सीमालढ्याची धार अधिक तीव्र करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने सजग राहून या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा. सीमालढा हा मराठी अस्मितेचा लढा आहे. हा लढा प्रत्येक मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता कोणतीही चुकीची भूमिका न घेता, संघटितपणे पुढे जात लढ्याला निर्णायक वळण द्यायला हवे!