बेळगाव लाईव्ह :भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) जाहीर केलेल्या ताज्या हवाई वाहतुकीच्या आकडेवारीनुसार गेल्या मार्च 2025 मध्ये बेळगाव विमानतळावरील (आयएक्सजी) प्रवाशांच्या वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे.
बेळगाव विमानतळावर फेब्रुवारी 2025 च्या तुलनेत 28,370 प्रवाशांची वाहतूक झाली असून जी 6.18 टक्के इतकी वाढली आहे. याव्यतिरिक्त या महिन्यात विमानतळावर 420 विमानांची ये-जा झाली असून 0.7 मेट्रिक टन मालवाहतूक नोंदवली गेली आहे. व्यापक संदर्भात बेळगाव विमानतळाने 2024 च्या दिनदर्शिका वर्षात लक्षणीय क्रियाकलाप प्रदर्शित करताना 3.47 लाख प्रवाशांना सेवा दिली आणि 5,591 विमानांच्या हालचाली सुलभ केल्या. याद्वारे प्रादेशिक प्रवासासाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून बेळगाव विमानतळाने स्वतःला स्थापित केले आहे.
गेल्या तीन महिन्यात
बेळगाव विमानतळावर झालेली प्रवासी व मालवाहतूक (अनुक्रमे
महिना-वर्ष : मासिक प्रवाशांची संख्या, विमानांची हालचाल, मालवाहतूक यानुसार) पुढील प्रमाणे आहे. जानेवारी-2025 : 27435, 402, 1.7 मेट्रिक टन. फेब्रुवारी-2025 : 26717, 376, 1.0 मेट्रिक टन. मार्च-2025 : 28370, 420, 0.7 मेट्रिक टन. एकूण : 82,522, 1198, 3.4 मेट्रिक टन. (स्रोत: भारतीय विमानतळ प्राधिकरण)
बेळगाव विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असली तरी स्टार एअरने आपले प्रमुख अखंड (नॉन-स्टॉप) उड्डाण मार्ग बंद केल्याने कनेक्टिव्हिटीला मोठा धक्का बसला आहे. स्टार एअरलाइनने 28 मार्च 2025 पासून बेंगलोर आणि बेळगाव दरम्यान आणि 14 एप्रिल 2025 पासून बेळगाव आणि नागपूर दरम्यानची उड्डाणे बंद केली आहेत. सदर बदलांमुळे या प्रदेशातील थेट मार्गांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या प्रवास पर्यायांवर परिणाम होऊ शकतो आणि एप्रिल महिन्यापासून प्रवाशांची संख्या कमी होऊ शकते. प्रवासी वाहतुकीतील वाढ विमानतळाचे वाढते महत्त्व दर्शवत असली तरी उड्डाणे रद्द केल्याने मजबूत कनेक्टिव्हिटी राखण्यात येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश पडू शकतो. ही परिस्थिती इतर विमान कंपन्यांना त्यांच्या सेवांमध्ये विस्तार करण्याची संधी देऊ शकते, ज्यामुळे बेळगाव विमानतळाच्या सततच्या उत्कर्षाला पाठिंबा मिळेल.